Tukaram mundhe: आवडतं हॉटेल, आवडता सिनेमा कोणता, पुढची बदली कधी होणार? तुकाराम मुंढेंची उत्तरं काय?
25 वेळा बदली झालेले आणि एफडीएचे आयुक्त म्हणून सध्या प्रचंड गाजत असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना आवडतं हॉटेल कोणतं? आवडता सिनेमा कोणता आणि पुढची बदली कधी होणार? त्यांनी नेमकी काय दिलीत उत्तरं? जाणून घ्या...

तुकाराम मुंढे म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते कडक शिस्तीचे अधिकारी आणि नियम मोडणाऱ्यांवर थेट कारवाई करणारे आयएएस अधिकारी. आपल्या नोकरीच्या आतापर्यंतच्या 21 वर्षांच्या काळात तब्बल 25 वेळा त्यांची बदली झाली. सध्या एफडीए आयुक्त म्हणून काम करताना त्यांनी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. आपल्या कामाची माहिती ते वेळोवेळी व्हिडिओ आणि पत्रकार परिषदांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत असतात. पण कामाच्या पलीकडे तुकाराम मुंढे यांना काय आवडतं? त्यांचा आवडता सिनेमा कोणता? पुढची बदली कधी होणार? अशाच काही प्रश्नांची उत्तरं त्यांनी वन-टू-वन रॅपिड फायरमध्ये एका मुलाखतीत दिली आहेत.
एफडीए आयुक्त झाल्यानंतर कारवाईचा धडाका
एफडीए आयुक्तपदाची जबाबदारी घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी अनेक ठिकाणी तपासणी सुरू केली. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, क्लब आणि खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या ठिकाणी जाऊन नियम तपासण्यात आले. अन्नामध्ये भेसळ करणारे, स्वच्छतेचे नियम न पाळणारे आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर त्यांनी कारवाई केली.
एवढंच नाही, तर सामान्य नागरिकांना तक्रार करता यावी यासाठी हेल्पलाइन आणि तक्रार नोंदवण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. कोणत्या ठिकाणी काय कारवाई झाली, कुठे काय काळजी घ्यायची, याची माहिती ते व्हिडिओ आणि पत्रकार परिषदांमधून देत असतात. खाद्यपदार्थ घेताना नागरिकांनी काय काळजी घ्यावी, याबाबतही ते वारंवार सूचना करतात.
रॅपिड फायरमध्ये काय म्हणाले तुकाराम मुंढे?
आवडतं हॉटेल कोणतं? या प्रश्नावर त्यांनी अगदी थोडक्यात ‘नो’ असं उत्तर दिलं. आतापर्यंत भेटलेले सर्वात प्रामाणिक राजकारणी कोण? देशात असे अनेक आहेत, पण एकाच व्यक्तीचं नाव सांगणं कठीण आहे, असं ते म्हणाले. आवडता सिनेमा कोणता? या प्रश्नावर ‘मुकद्दर का सिकंदर’ हा आपला आवडता सिनेमा असल्याचं त्यांनी सांगितलं. आवडता हिरो कोण या प्रश्नावर बोलताना, आपला आवडता हिरो बदलत राहतो, असं उत्तर त्यांनी दिलं. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढची बदली कधी होणार? यावर त्यांनी ‘हे कधीही होऊ शकतं, आणि त्यासाठी तयार रहावं लागतं, असं उत्तर मुंढेंनी दिलं. याशिवाय तुमची लेगसी म्हणजेच वारसा काय असेल? यावर ते म्हणाले, ‘माझी कोणतीही लेगसी नाहीये. जनतेसाठी जे योग्य आहे ते करणं ही माझी जबाबदारी आहे, असं मी समजतो.’ त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्या या रोखठोक उत्तरांची एकच चर्चा आहे.
