जमावात उभ्या असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या चेहऱ्यावर फेकली चप्पल; व्हिडीओ व्हायरल

चाहत्याने तोंडावर चप्पल फेकल्यानंतर अभिनेत्याने जे केलं ते पाहून नेटकरी म्हणाले..

जमावात उभ्या असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या चेहऱ्यावर फेकली चप्पल; व्हिडीओ व्हायरल
अभिनेत्यावर चाहत्याने फेकली चप्पल
Image Credit source: Twitter
| Updated on: Dec 20, 2022 | 7:52 AM

कर्नाटक: सेलिब्रिटींना चाहत्यांच्या प्रेमासोबतच अनेकदा त्यांच्या रोषालाही सामोरं जावं लागतं. सोशल मीडियावर अनेकदा कलाकार ट्रोल होतात. तर सार्वजनिक ठिकाणीही त्यांना कधी विरोध केला जातो. असंच काहीसं सध्या कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता दर्शन याच्यासोबत घडलंय. आपल्या आगामी ‘क्रांती’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दर्शन कर्नाटकमधील होसपेटे याठिकाणी पोहोचला होता. या कार्यक्रमादरम्यान एका चाहत्याने त्याच्यावर चप्पल फेकली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

रविवारी 18 डिसेंबर रोजी संध्याकाळी ही घटना घडली. कर्नाटकमधील होसपेटे याठिकाणी दर्शनच्या आगामी ‘क्रांती’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मंचावर उभा असलेला दर्शन चाहत्यांसोबत बोलत होता. त्याचवेळी खाली उभ्या असलेल्या एका व्यक्तीने त्याच्यावर चप्पल फेकली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला. चाहत्याने फेकलेली चप्पल दर्शनच्या तोंडाला लागल्याचं यात पहायला मिळतंय.

“यात तुझी काहीच चूक नाही”

ही घटना घडताच तिथले सुरक्षा कर्मचारी सतर्क होतात. विशेष म्हणजे तोंडाला चप्पल लागल्यानंतरही दर्शन अत्यंत शांतपणे त्या चाहत्याशी बोलताना दिसतो. “यात तुझी काहीच चूक नाही, मला काहीच समस्या नाही”, असं तो बोलतो आणि चिडलेल्या इतर चाहत्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर दर्शन लगेच तिथून निघून जातो.

संबंधित व्यक्तीने दर्शनवर ती चप्पल का फेकली, याचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. काही दिवसांपूर्वी दर्शनने केलेलं एक वक्तव्य स्त्रियांविरोधी असल्याचं म्हटलं जात आहे. याच कारणामुळे त्याला रोषाला सामोरं जावं लागलं.