सचिन पिळगांवकरांना अजिबात घेऊ नका..; ‘कापूसकोंडा’साठी संपूर्ण टीमचा होता नकार, दिग्दर्शकाचा खुलासा

‘कापूसकोंडा’ या चित्रपटाच्या निमित्ताने सचिन पिळगावकर आणि मधुराणी गोखले प्रभुलकर ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र आली आहे. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन सचिन मोहिते यांनी केलं आहे.

सचिन पिळगांवकरांना अजिबात घेऊ नका..; कापूसकोंडासाठी संपूर्ण टीमचा होता नकार, दिग्दर्शकाचा खुलासा
Sachin Pilgaonkar
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 26, 2026 | 12:19 PM

Sachin Pilgaonkar: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर सध्या त्यांच्या ‘कापूसकोंडा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. मात्र, या चित्रपटाच्या कास्टिंगबाबत एक रंजक गोष्ट समोर आली आहे. चित्रपटात सचिन पिळगावकर यांना घेण्याबाबत संपूर्ण टीमचा विरोध होता, अशी माहिती समोर आली आहे. खुद्द दिग्दर्शक सचिन मोहिते यांनी याविषयीचा खुलासा केला आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी कलाकारांची निवड नेमकी कशी झाली आणि टीमच्या मनात विरोध का होता, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शक सचिन मोहिते म्हणाले, “कथा लिहिताना माझ्या डोक्यात सचिन सरच होते. पण जेव्हा मी अनिरुद्ध आणि टीमला सांगितलं की आपण सचिन पिळगांवकर यांचा भूमिकेसाठी विचार करतोय, तेव्हा सगळे म्हणाले, अजिबात नाही. त्यांची इमेज अशी खूप सुपरक्यूट आहे. माझ्या डोक्यात स्पष्ट होतं की मला त्यांनाच विचारायचं आहे. तरी टीमचं ऐकून मी म्हणालो, सर नाही तर नाही. चला मग दुसरा अभिनेता शोधू. असं म्हणून मी टीमला कामाला लावलं. नंतर एकेदिवशी मी अनिरुद्धला फोन करून सांगितलं की आपल्याला साडेअकरा वाजता एका मिटींगला जायचंय. गाडीत बसल्यावर त्याने विचारलं, कुठे जायचंय? तेव्हा मी म्हटलं की सचिन पिळगांवकरांच्या घरी. मग त्याचं सुरू झालं की, अरे नाही, मी नाही. आपल्याला नाही करायचंय.”

Loading...

यामुळे सचिन मोहिते यांना पिळगांवकरांच्या घरी पोहोचलायला उशीर झाला. पंधरा मिनिटांत त्यांची दुसरी मिटींग होती. तेव्हा उरलेल्या पंधरा मिनिटांत त्यांनी कथा सांगण्यास सुरुवात केली. सचिन पिळगांवकर यांनी ती कथा पंधरा नाही तर पुढे अडीच तास ऐकली. यावेळी त्यांच्याजवळचा जॅक हा पाळीव श्वान तिथेच होता. “कथा ऐकल्यानंतर तो उठून उभा राहिला आणि माझ्याकडे येत त्याने पाय वगैरे असं काय काय केलं. मग तो सरांकडे गेला आणि तिथून निघून गेला. त्यामुळे त्यानेही कथेला होकार दिला असं म्हणायला हरकत नाही”, असं दिग्दर्शक म्हणाले.

‘कापूसकोंडा’ हा कौटुंबिक भावनांवर आधारित मराठी चित्रपट आहे. एका निवृत्त कर्मचाऱ्याच्या आयुष्यात कुत्र्याच्या आगमनानंतर घडणाऱ्या घटनांभोवती या चित्रपटाचं कथानक फिरतं. विशेष म्हणजे, कुत्र्याला घाबरणाऱ्या व्यक्तीचं त्याच प्राण्याशी हळूहळू जुळणारं नातं यात दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटात सचिन पिळगावकर यांच्यासोबत मधुराणी गोखले प्रभुलकर, भूषण पाटील, अक्षता पाडगावकर आणि जान्हवी तांबट हे कलाकारही आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us