शत्रुत्वामुळे बदललं ‘पती-पत्नी’चं नातं; सेटवरील भांडणावर अखेर अभिनेत्याने सोडलं मौन

'ये है मोहब्बतें' ही मालिका खूप गाजली होती. या मालिकेतील दिव्यांका त्रिपाठी आणि करण पटेलची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. मात्र मालिकेत काम करताना या दोघांमध्ये वाद झाल्याच्याही जोरदार चर्चा होत्या. त्यावर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करणने मौन सोडलं आहे.

शत्रुत्वामुळे बदललं पती-पत्नीचं नातं; सेटवरील भांडणावर अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
दिव्यांका त्रिपाठी, करण पटेल
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 14, 2023 | 2:49 PM

मुंबई | 14 ऑक्टोबर 2023 : मालिका किंवा चित्रपटाच्या सेटवर अनेक तास एकमेकांसोबत काम करताना कधी-कधी कलाकारांमध्ये वादही निर्माण होतात. एकमेकांच्या न पटणाऱ्या गोष्टी समजून घेतल्या नाहीत, तर हा वाद आणखी वाढतो. तरीसुद्धा असे अनेक कलाकार इंडस्ट्रीत आहेत, ज्यांचं खऱ्या आयुष्यात एकमेकांशी अजिबात पटत नाही, पण पडद्यावर मात्र ते चोख भूमिका बजावतात. रिअल लाइफमध्ये कितीही भांडणं झाली तरी मग रिल लाइफमध्ये त्यांना पडद्यावर रोमान्ससुद्धा करावा लागतो. अशीच एक जोडी म्हणजे दिव्यांका त्रिपाठी आणि करण पटेल. स्टार प्लसच्या ‘ये है मोहब्बतें’ या लोकप्रिय मालिकेत दोघांनी पती-पत्नीची भूमिका साकारली होती. या दोघांमधील केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडायची. मात्र खऱ्या आयुष्यात त्यांच्या शीतयुद्ध होतं.

करणने सोडलं मौन

‘ये है मोहब्बतें’ या मालिकेत पती-पत्नीची भूमिका साकारणारे करण आणि दिव्यांका हे खऱ्या आयुष्यात एकमेकांचा चेहरासुद्धा पाहणं पसंत करत नाहीत, अशी चर्चा होती. सेटवरील या दोघांचं शीतयुद्ध इतर कलाकारांनाही स्पष्ट दिसून येत होतं. या सर्व चर्चांवर आता करण पटेलने मौन सोडलं आहे. ‘ई टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत करणने सांगितलं की तो या चर्चांबद्दल वाचून खूप हसायचा.

दिव्यांकाबद्दल काय म्हणाला करण?

“दिव्यांका माझी खूप चांगली मैत्रीण आहे. नुकतंच तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर माझ्या पहिल्या चित्रपटाचा प्रोमो शेअर करत मला पाठिंबा दिला. तिने मला मेसेजसुद्धा केला होता. माझ्या चित्रपटाचा प्रोमो तिला खूप आवडल्याचं तिने मला सांगितलं. मालिकेत काम करताना आम्ही सेटवर एकमेकांसोबत बसून कॉफी पित नव्हतो, याचा अर्थ असा होत नाही की आमच्यात चांगली मैत्री नाही. आम्हा दोघांचं व्यक्तिमत्त्व वेगवेगळं आहे. मी जरा मस्तीखोर आहे. सेटवर मी खूप मस्ती करायचो. लोकांसोबत मजामस्ती करत राहणं मला आवडायचं. मात्र दिव्यांका तशी नाहीये. तिला एका कोपऱ्यात बसून पुस्तकं वाचायला आवडतं. पण याचा अर्थ असा होत नाही की आम्हाला एकमेकांचा चेहरासुद्धा पहायला आवडायचं नाही. आम्ही चांगले मित्र आहोत. आमच्या मनात एकमेकांविषयी आदर आहे”, असं करणने स्पष्ट केलं.

करणने यावेळी हेसुद्धा सांगितलं की जेव्हा कधी ते भांडणाचे वृत्त वाचायचे, तेव्हा त्यांना खूप हसू यायचं. “आम्ही दोघं नेहमी त्यावर चर्चा करायचो. मी सेटवर उशिरा आलो आणि तू निघून गेलीस, हे तू वाचलंस का, असं मी दिव्यांकाला विचारायचो. त्यावर दोघं पोट धरून हसायचो. त्या चर्चा तथ्यहीन होत्या,” असं करण पुढे म्हणाला.