सेक्स सीन्स करण्याबाबत करीना कपूरचं स्पष्ट मत; म्हणाली “पडद्यावर.. “

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री करीना कपूर पडद्यावर इंटिमेट सीन्स साकारण्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. त्याचप्रमाणे असे सीन्स करणार नसल्याचंही तिने स्पष्ट केलंय. इंटिमेट सीन्स कथेसाठी काही महत्त्वाचे नसत्ता, असं मत तिने मांडलंय.

सेक्स सीन्स करण्याबाबत करीना कपूरचं स्पष्ट मत; म्हणाली पडद्यावर..
Kareena Kapoor
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 12, 2025 | 2:10 PM

अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये इंटिमेट आणि सेक्स सीन्स सर्रासपणे पहायला मिळतात. तर काही भारतीय चित्रपटांमध्येही इंटिमेट सीन्स दाखवणं हल्ली सर्वसामान्य झालं आहे. असं असलं तरी प्रत्येक अभिनेत्री तसे सीन मोठ्या पडद्यावर करण्यात कम्फर्टेबल असेलच असं नाही. बॉलिवूड इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री करीना कपूर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. चित्रपटाची कथा पुढे नेण्यासाठी सेक्स सीन्सची गरज नसते, असं स्पष्ट मत तिने मांडलंय. त्याचप्रमाणे भारतीय सिनेसृष्टीत सेक्स किंवा लैंगिकता हा मानवी अनुभव म्हणून पाहिला जात नाही, असंही ती म्हणाली.

‘डर्टी मॅगझिन’ला दिलेल्या मुलाखतीत करीना म्हणाली, “एखाद्या चित्रपटाची कथा पुढे नेण्यासाठी सेक्स सीन्स तितके महत्त्वाचे नसतात. त्याचप्रमाणे ही काही अशी गोष्ट नाही की कथा पुढे नेण्यासाठी ती दाखवलीच पाहिजे. मला माहितीये की ऑनस्क्रीन असे सीन्स करताना मी कम्फर्टेबल नसेन. मी याआधी कधीच तसे सीन्स केले नाहीत.” करिअरमध्ये असे सीन्स करण्यासाठी तयार नसल्याचंही करीनाने या मुलाखतीत सांगितलं. यावेळी ती भारतीय प्रेक्षकांच्या मानसिकतेवरही मोकळेपणे व्यक्त झाली.

“या संपूर्ण कल्पनेकडे आपण कसं पाहतो ते महत्त्वाचं आहे. आम्ही लैगिकता किंवा सेक्स याकडे मानवी अनुभव म्हणून पाहत नाही. हे सर्व ऑनस्क्रीन दाखवण्याआधी त्याकडे तशा दृष्टीकोनातून पाहणं आणि त्या गोष्टीचा आदर करणं खूप महत्त्वाचं आहे. हे माझं मत आहे. याबाबतीत आम्ही पाश्चिमात्य देशांइतके मोकळे नाही आहोत”, असं करीना पुढे म्हणाली.

करीना तिच्या बेधडक मतांसाठी ओळखली जाते. अनेकदा बॉलिवूड चित्रपटांमध्ये कथेच्या गरजेनुसार इंटिमेट सीन्स दाखवले जातात, तर कधी फक्त प्रेक्षकांचं लक्ष वेधण्यासाठी अशा सीन्सचा भरणा केला जातो. मात्र इंटिमेट सीन्स किंवा सेक्स सीन्स हे कथेसाठी तितके महत्त्वाचे नसतात, असं स्पष्ट मत करीनाने मांडलं आहे. त्याचप्रमाणे असे सीन्स कधी करणार नसल्याचंही तिने सांगितलं आहे. करीनाच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, ती नुकतीच ‘सिंघम अगेन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यानंतर ती मेघना गुलजार दिग्दर्शित ‘दायरा’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे.