करिश्मा कपूरच्या पूर्व पतीच्या संपत्तीचा वाद चिघळला; 30000 कोटींप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

दिवंगत उद्योगपती संजय कपूरच्या तब्बल 30 हजार कोटींच्या संपत्तीवरून सुरू असलेला कौटुंबिक वाद आता पुन्हा न्यायालयात पोहोचला आहे. माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या मध्यस्थीनंतरही राणी कपूर आणि प्रिया कपूर यांच्यात तोडगा निघू शकला नाही.

करिश्मा कपूरच्या पूर्व पतीच्या संपत्तीचा वाद चिघळला; 30000 कोटींप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
करिश्मा कपूर आणि तिची मुलं, संजय कपूर आणि प्रिया सचदेव
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 27, 2026 | 8:46 AM

Sunjay Kapur: अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि दिवंगत उद्योगपती संजय कपूरच्या निधनानंतर त्याच्या कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीवरून सुरू झालेला कौटुंबिक वाद दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचा होत आहे. जवळपास 30 हजार कोटी रुपयांच्या आरके फॅमिली ट्रस्टवरून संजय कपूर यांच्या आई राणी कपूर आणि पत्नी प्रिया सचदेव कपूर यांच्यात कायदेशीर संघर्ष सुरू आहे. हा वाद सामोपचाराने मिटवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांची मध्यस्थ म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, जवळपास 15 बैठका होऊनही दोन्ही बाजूंमध्ये कोणताही तोडगा निघाला नाही. अखेर 26 नोव्हेंबर रोजी सुप्रीम कोर्टाने मध्यस्थी प्रक्रिया बंद केली.

6 हजार कोटींची मागणी, 30 हजार कोटींच्या ट्रस्टवरून वाद

सुनावणीदरम्यान राणी कपूर यांच्या वकिलांनी ट्रस्टमधील दाव्यांच्या निपटाऱ्यासाठी 6 हजार कोटी रुपयांची मागणी केल्याचं सांगितलं. दुसरीकडे, प्रिया कपूर यांच्या वकिलांनी या ट्रस्टमधील संपत्तीचं मूल्य जवळपास 30 हजार कोटी रुपये असल्याचं न्यायालयाला सांगितलं. यावर न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने सहा हजार कोटी रुपये देण्यासाठी संपत्ती विकण्याची अपेक्षा आहे का, असा सवाल उपस्थित केला.

Loading...

प्रिया कपूर यांच्या वकिलांनी ट्रस्टमधील 60 टक्के संपत्तीवर त्यांचा अधिकार असल्याचा दावा केला. उर्वरित 40 टक्के हिस्सा संजय कपूर यांच्या मुलांमध्ये विभागला जावा, अशी त्यांची भूमिका होती. तर अभिनेत्री करिश्मा कपूरची मुलं समायरा आणि कियान यांच्या वकिलांनी ट्रस्टमध्ये 24 ते 26 टक्के हिस्स्याचा दावा केला.

राणी कपूर यांचे गंभीर आरोप

या संपूर्ण प्रकरणात राणी कपूर यांनी आरके फॅमिली ट्रस्टच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यांचे पती आणि सोना ग्रुपचे संस्थापक सुरिंदर कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीतील मालमत्ता कोणतीही पूर्वसंमती न घेता ट्रस्टमध्ये हस्तांतरित करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. ट्रस्टची कागदपत्रं बनावट असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे हा ट्रस्ट रद्दबातल ठरवण्याची मागणी त्यांनी दिल्ली हायकोर्टात केली आहे.

आता पुढे काय होणार?

सुप्रीम कोर्टाने मध्यस्थी बंद करताना ‘समझोता कोणावरही लादता येत नाही’, असं स्पष्ट केलं. राणी कपूर यांनी ट्रस्टमधील संपत्ती सुरक्षित ठेवण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टाने ठराविक कालमर्यादेत निर्णय घ्यावा, असे संकेतही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान, 12 जून 2025 रोजी इंग्लंडमध्ये पोलो सामना खेळताना संजय कपूरचं निधन झालं होतं. त्याच्या निधनानंतर सुरू झालेला हा संपत्तीचा वाद आता पुन्हा न्यायालयीन लढाईच्या दिशेने गेला आहे. विशेष म्हणजे, ट्रस्टच्या वैधतेबाबत आणि संबंधित व्यक्तींच्या हिस्स्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या पुढील सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us