KBC 18 : ‘केबीसी’तून जिंकलेल्या 1 कोटीचं काय करणार? जळगावच्या मराठमोळ्या भूषण ठाकरेचं उत्तर ऐकून पाणावतील डोळे
KBC 18: ‘कौन बनेगा करोडपती 18’मध्ये एक कोटी रुपये जिंकणारा जळगावचा भूषण ठाकरे आईसाठी सोन्याचे दागिने खरेदी करणार आहे. वडिलांची मजुरी, घरची आर्थिक परिस्थिती आणि दहा वर्षांच्या प्रयत्नांबद्दल त्याने सांगितलेला संघर्ष प्रेरणादायी आहे.

KBC 18 : ‘कौन बनेगा करोडपती 18’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोला यंदाच्या पर्वातील पहिला करोडपती स्पर्धक मिळाला आहे. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील भूषण ठाकरे याने ज्ञानाच्या जोरावर तब्बल एक कोटी रुपये जिंकत मोठं यश संपादन केलं आहे. मात्र भूषणसाठी ही केवळ बक्षिसाची रक्कम नाही, तर आपल्या कुटुंबाला वर्षानुवर्षे भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणींतून बाहेर काढण्याची संधी आहे. विशेष म्हणजे, या पैशांतून सर्वप्रथम आईसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याची त्याची इच्छा आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या संघर्षाचा आणि पुढील योजनांचा खुलासा केला.
आईसाठी सोन्याचे दागिने घेण्याचं स्वप्न
भूषणने सांगितलं, जिंकलेल्या रकमेतील काही पैसे अशा ठिकाणी गुंतवण्याचा त्याचा विचार आहे, जिथून दर महिन्याला नियमित उत्पन्न मिळेल. याशिवाय आईसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याची त्याची खास इच्छा आहे. त्याच्या आईने एकेकाळी वडिलांच्या कमाईतून थोडेथोडे पैसे वाचवून जवळपास 20 ते 25 ग्रॅम सोनं जमा केलं होतं. मात्र भूषणच्या शिक्षणासाठी आणि हॉस्टेलच्या खर्चासाठी हे सोनं विकावं लागलं. आयुष्यभर इतरांनी दागिने घातलेले पाहणाऱ्या आईने स्वत:साठी दागिने घेण्याचा विचारही केला नाही. त्यामुळे आता तिला सोन्याचे दागिने घालून आनंदी पाहायचं आहे, असं भूषणने सांगितलं.
वडिलांना मजुरी करताना पाहून व्हायचं दुःख
भूषणचं बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेलं. त्याचे आई-वडील दुसऱ्यांच्या शेतात रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. याच पैशांतून त्यांनी भूषण आणि त्यांच्या लहान भावाचं शिक्षण पूर्ण केलं. सरकारी शाळेच्या वसतिगृहात राहून भूषणने शिक्षण घेतलं. वडील वयाच्या 55व्या वर्षीही तरुण मुलांप्रमाणे कष्ट करत असल्याचं पाहून त्याला वाईट वाटायचं. गेल्या तीन-चार वर्षांत वडिलांनी क्वचितच नवीन कपडे घेतले होते. मुलगा शिकत असताना घरासाठी आर्थिक मदत करू शकत नाही, याचीही त्यांना खंत वाटायची. मात्र वडिलांनी नेहमी भूषणला नोकरी किंवा मजुरी करण्याऐवजी शिक्षणावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितलं.
2016 पासून केबीसीमध्ये येण्यासाठी प्रयत्न
केबीसीमध्ये सहभागी होण्यासाठी भूषणने तब्बल दहा वर्षे प्रयत्न केले. 2016 मध्ये वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याने नोंदणी सुरू केली. सुरुवातीची काही वर्षे ऑडिशनसाठी बोलावणंही आलं नाही. 2021 ते 2026 या काळात अनेकदा ऑडिशन आणि मुलाखती देऊनही निवड झाली नव्हती. अखेर यंदा त्याचं स्वप्न पूर्ण झालं.
भूषणच्या आईवडिलांनाही केबीसीची विशेष आवड होती. ते स्वत: फारसे शिकलेले नसले, तरी कार्यक्रम सुरू झाला की भूषणला बोलावून घेत असत. तो प्रश्नांची उत्तरं देत असताना त्यांना खूप आनंद व्हायचा. आज त्याच कार्यक्रमामुळे मुलाने एक कोटी रुपये जिंकल्याने त्यांच्या कुटुंबाचं आयुष्य बदलण्याची आशा निर्माण झाली आहे.