KBC 18: मजुराच्या मुलाने केबीसीमध्ये जिंकले 1 कोटी, जळगावच्या भूषण ठाकरेचा संघर्ष; खिशात फक्त 24 रुपये घेऊन आलेला मुंबईत
KBC 18: अमिताभ बच्चन यांनीही भूषणच्या यशाचं कौतुक केलं. त्याच्या संघर्षाची कहाणी ऐकून ते भावूक झाल्याचंही प्रोमोमध्ये पाहायला मिळतं. आता भूषण 7 कोटींची रक्कम जिंकणार की नाही, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

‘कौन बनेगा करोडपती’ अर्थात KBC या लोकप्रिय क्विझ शोच्या 18 व्या पर्वाला पहिला करोडपती मिळाला आहे. विशेष म्हणजे, हा मान महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एका मराठमोळ्या तरुणाने मिळवला आहे. भूषण ठाकरे असं या तरुणाचं नाव असून, त्याने आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि जिद्दीच्या जोरावर तब्बल 1 कोटी रुपयांची रक्कम जिंकली आहे. एवढंच नाही, तर आता तो थेट 7 कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचला आहे. एकेकाळी खिशात अवघे 24 रुपये घेऊन मुंबईत आलेल्या भूषणचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. भूषण ठाकरे हा मूळचा जळगाव जिल्ह्यातील बलवाडी गावचा रहिवासी आहे. वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी त्याने KBC सारख्या लोकप्रिय कार्यक्रमात करोडपती होण्याचा मान मिळवला आहे. भूषण स्पर्धा परीक्षांची तयारी करत असून, त्याला आयुष्यात काहीतरी मोठं करून दाखवायचं आहे. याच स्वप्नासाठी तो गेल्या काही काळापासून घरापासून दूर राहून संघर्ष करत आहे.
‘कौन बनेगा करोडपती’च्या हॉटसीटवर बसल्यानंतर भूषणने आपल्या आयुष्यातील संघर्षाची कहाणी अमिताभ बच्चन यांच्यासमोर सांगितली. त्याने सांगितलं की, तो गेल्या दीड वर्षांपासून घरी गेलेला नाही. आयुष्यात काहीतरी चांगलं करून दाखवल्याशिवाय घरी परतणार नाही, असं वचन त्याने आपल्या आई-वडिलांना दिलं होतं. भूषणच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्याचे वडील रोजंदारीवर मजुरीचं काम करायचे, तर आईची प्रकृती नेहमीच खराब असायची. तिच्यावर अनेक शस्त्रक्रियाही झाल्या आहेत. घरातील आर्थिक अडचणी असूनही वडिलांनी भूषणच्या शिक्षणात कोणतीही कमतरता भासू दिली नाही. स्वतः कष्ट करून त्यांनी पत्नीची काळजी घेतली आणि मुलाचं शिक्षणही पूर्ण केलं.
पहा प्रोमो-
View this post on Instagram
भूषणने अमिताभ बच्चन यांना सांगितलं की, वडील मजुरी करत असले तरी त्यांनी त्याला कधीही तेच काम करण्यासाठी दबाव टाकला नाही. उलट त्यांनी त्याला शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. एकदा भूषणला आपणही काहीतरी काम करून कुटुंबाला हातभार लावावा असं वाटलं. त्यामुळे त्याने गावातील नदीवर काम करण्यास सुरुवात केली. मात्र, वडिलांना ही गोष्ट मान्य नव्हती. त्यांनी त्याला एकतर घरी राहून अभ्यास कर किंवा शिक्षण पूर्ण कर, असं सांगितलं.
भूषणच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्याचं मुंबईत येणं. मोठी स्वप्नं घेऊन तो अवघे 24 रुपये खिशात ठेवून मुंबईत आला होता. परिस्थिती कितीही कठीण असली तरी काहीतरी करून दाखवायचंच, हा त्याचा निर्धार होता. आज त्याच भूषणने KBC च्या मंचावर 1 कोटी रुपये जिंकून आपल्या मेहनतीची ताकद दाखवून दिली आहे.
