‘कोंबळी पळाली’ गाण्याच्या शूटसाठी पैसेच नव्हते, भरत जाधव दिवसभर..; केदार शिंदेंनी सांगितला किस्सा
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय गाण्यांपैकी एक म्हणजे 'जत्रा' चित्रपटातील 'कोंबडी पळाली'. आजही या गाण्याचे सूर लागले की प्रेक्षकांना ठेका धरल्याशिवाय राहवत नाही. मात्र, हे आयकॉनिक गाणं शूट करण्यासाठी दिग्दर्शक केदार शिंदे यांच्याकडे पैसेच कमी पडले होते.

मराठी चित्रपटसृष्टीत काही चित्रपट आणि गाणी अशी आहेत, ज्यांची लोकप्रियता वर्षानुवर्षे कायम आहे. त्यापैकीच एक म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे यांचा ‘जत्रा : ह्यालागाड रे त्यालागाड’ हा चित्रपट. 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. चित्रपटातील विनोदी प्रसंगांपासून ते गाण्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. विशेषतः ‘कोंबडी पळाली’ या गाण्याने तर लोकप्रियतेचे नवे विक्रम केले. भरत जाधव आणि क्रांती रेडकर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही लग्नसमारंभ, कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्ये आवर्जून वाजवलं जातं. मात्र, या गाण्याच्या शूटिंगमागे एक मजेशीर किस्सा दडला आहे. खुद्द केदार शिंदे यांनीच याचा खुलासा केला आहे.
‘लोक पैसे घेऊन नाचतात, पण भरत पैसे देऊन नाचला’
केदार शिंदे आणि भरत जाधव यांची जोडी पुन्हा एकदा ‘गणा धाव रे’ या चित्रपटाच्या निमित्ताने चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान केदार शिंदे यांनी अल्ट्रा बज मराठीला दिलेल्या मुलाखतीत ‘जत्रा’ चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी ‘कोंबडी पळाली’ गाण्याच्या शूटिंगचा भन्नाट किस्सा सांगितला. केदार म्हणाले, “कोंबडी पळाली हे गाणं खूप गाजलं. त्यावेळी जत्रा या सिनेमाची निर्मिती माझ्याकडून झाली होती. पण गाण्याच्या शूटिंगसाठी माझ्याकडे थोडे पैसे कमी पडले होते. शूटिंगच्या दिवशी सकाळी मी भरत जाधवला फोन केला होता. भरत हा एकमेव असा अभिनेता आहे, जो घरातून पैसे घेऊन दिवसभर कोंबडी पळाली या गाण्यावर नाचत होता. म्हणजे लोक पैसे घेऊन नाचतात, पण हा पैसे देऊन नाचत होता.”
केदार शिंदे यांनी पुढे सांगितलं की, ‘कोंबडी पळाली’ या गाण्याचं दोन दिवसांचं शूटिंग भरत जाधव यांच्या पैशांमधून पूर्ण झालं. त्यानंतर त्यांनी भरत यांचे पैसे परतही केले. मात्र, हा प्रसंग त्यांच्या कायम स्मरणात राहिला आहे. आजही जेव्हा ते हे गाणं पाहतात, तेव्हा त्यांना भरत यांची आठवण होते. विशेष म्हणजे, भरत यांनी या गाण्यावर चित्रपटात एकदाच परफॉर्म केलं, मात्र त्यानंतर अनेकांनी या गाण्यावर नृत्य सादर करून पैसे कमावले. भरत यांना मात्र त्याचा वेगळा आर्थिक फायदा झाला नाही, अशी मिश्किल टिप्पणीही केदार यांनी केली.
अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं आणि आनंद शिंदे यांच्या आवाजातील हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. या गाण्याचे बोल जितेंद्र जोशी यांनी लिहिले आहेत. पुढे याच गाण्याच्या संगीतावर आधारित ‘अग्निपथ’ चित्रपटातील कतरिना कैफचं ‘चिकनी चमेली’ हे गाणंही तुफान गाजलं.