‘छावा’ सिनेमावरून वातावरण नासवलं, महामानवांवरचे सिनेमे…, ‘फुले’ सिनेमावर किरण मानेंची लक्षवेधी पोस्ट

Kiran Mane Post on Phule movie: 'छत्रपती शिवरायांवर सिनेमे काढून अलगद मुस्लिमद्वेष पेरला...', 'छावा' नंतर 'फुले' सिनेमामुळे वादग्रस्त परिस्थिती, किरण मानेंच्या एका पोस्टने वेधलं सर्वांचं लक्ष, सर्वत्र त्यांच्या पोस्टची चर्चा...

छावा सिनेमावरून वातावरण नासवलं, महामानवांवरचे सिनेमे..., फुले सिनेमावर किरण मानेंची लक्षवेधी पोस्ट
| Updated on: Apr 11, 2025 | 12:36 PM

Kiran Mane Post on Phule movie: ‘छावा’ सिनेमानंतर आता ‘फुले’ सिनेमावरुन वाद निर्माण झाला आहे. महात्मा जोतिबा फुले यांच्या आयुष्यावर आधारित ‘फुले’ हा चरित्रात्मक हिंदी सिनेमा सध्या वादळाच्या केंद्रस्थानी सापडला आहे. त्यामुळेच महात्मा फुले जयंतीला प्रदर्शित होणार असलेला हा सिनेमा पुढे ढकलण्यात आला. आता ‘फुले’ सिनेमा 11 एप्रिल रोजी नाही तर, 25 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमात अभिनेता प्रतिक गांधी आणि अभिनेत्री पत्रलेखा मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमावरुन वादग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली असताना अभिनेते किरण माने यांनी लक्षवेधी पोस्ट व्हायरल होत आहे.

फेसबूकवर पोस्ट करत किरण माने म्हणाले, ‘.मित्रांनो, का माहिती नाही, पण ‘फुले’ सिनेमाबद्दल माझ्या मनात संशय आहे. ही मनूवादी जमात महाकारस्थानी आहे भावांनो. त्यांनीच ‘स्पॉन्सर्ड’ केलेल्या दिग्दर्शकांनी छत्रपती शिवरायांवर सिनेमे काढून अलगद मुस्लीमद्वेष पेरला. प्रेक्षकांना शिवरायांच्या खर्‍या सर्वसमावेशक विचारांपासून दूर नेण्यासाठी रचलेले ते कपट होते. कोरटकर आणि सोलापूरकर यांच्यामुळे त्या लोकांच्या मनात शिवरायांविषयी काय घाण भरली आहे ती बाहेर आलेली आहे. याच वृत्तीच्या पिलावळीनं बनवलेले सिनेमे आपण जयजयकार करत बघितले होते, हे लक्षात घ्या. ही बांडगुळं आता ज्ञानोबा,मुक्ताबाई आणि तुकोबारायांवर ‘डल्ला’ मारायला सज्ज झाली आहेत.

…चार खर्‍या गोष्टी सांगून, महामानवांचा उदोउदो करायचा… आणि आपल्याला विश्वासात घेत दहा खोट्या गोष्टी खपवायच्या, यात ही जमात माहीर आहे ! तुम्ही ‘चॅलेंज’ करत नाही तोवर हे असंच चालू रहाणार.

‘फुले’ सिनेमाबाबतीत मी चुकीचा ठरलो, तर मला आनंदच आहे… पण त्या सिनेमातही खोटे पत्ते असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ट्रेलरमधल्या एखाद्या प्रसंगावरुन वादंग निर्माण करत पब्लिसिटी करायची ‘लेझीम-ट्रिक’ ताजी आहे ! सावध रहा… आमच्या क्षेत्रातून तुमच्या मेंदूत विष पेरण्यासाठी करोडोंचा ओघ सुरू आहे… त्याला बळी पडू नका.

महात्मा फुलेंनी अडाणी बहुजनांना नाडणाऱ्या भटशाहीला ज्या निर्दयपणे दणके दिलेत ते त्याच तीव्रतेनं सिनेमात असतील का? याविषयी मला शंका आहे. त्यांनी शोधलेली शिवरायांची समाधी… सुरू केलेला पहिला शिवजयंती उत्सव…बहुजन हिंदु मुस्लीमांना एकमेकांत लढवून स्वत: वर्चस्व गाजवणार्‍या मनुवादी वृत्तीला शह देण्यासाठी महात्मा फुलेंनी महंमद पैगंबरांवर रचलेला सुंदर पोवाडा… हे सगळं त्या सिनेमात असेल का???

छावा सिनेमावरून ज्या पद्धतीनं वातावरण नासवलं गेलं… दंगल घडवून आणायचा प्रयत्न झाला…तसं होणार असेल तर माझ्या भावाबहिणींनो… शक्यतो महामानवांवरचे सिनेमे बघूच नका. तुमचं महामानवांवर लैच जबरदस्त प्रेम असेल, तर महामानवांचा खरा इतिहास सांगणारी असंख्य पुस्तकं आहेत, ती वाचा.

कुठल्याही सिनेमाच्या वादात पडून त्याची फुकट पब्लिसिटी करू नका. सिनेमा म्हणजे इतिहास नव्हे. त्यामुळे चर्चा करू नका. ज्यांना ते उगाळत रहायचंय त्यांना उगाळूद्या. आपण ‘जागे’ राहुया… तुकोबाराया म्हणून गेलेत : आतां जागा रे भाई जागा रे । चोर निजल्या नाडूनि भागा रे ॥ – किरण माने.’ सध्या किरण माने यांची पोस्ट तुफान व्हायरल होत असून. नेटकरी कमेंटत्या माध्यमातून प्रतिक्रिया देत आहेत.