सुपरस्टार्सच्या घराशेजारी लक्ष्याचे ‘किर्तीकर निवास’, ‘आयत्या घरात घरोबा’मधील बंगल्याची चर्चा, मुंबईत कुठे आहे?
‘आयत्या घरात घरोबा’ हा सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय हिट सिनेमांच्या यादीमधील एक आहे. या चित्रपटातील 'किर्तीकर निवास' हे कायम चर्चेत असते. हा बंगला मुंबईत कुठे आहे? जाणून घ्या...

मराठी चित्रपटसृष्टीमधील असे अनेक सिनेमे आहेत जे आजही आवडीने प्रेक्षक पाहातात. हे सिनेमे प्रदर्शित होऊन कित्येक वर्ष उलटली आहेत तरी देखील हे सिनेमे प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. 1991 साली प्रदर्शित झालेला ‘आयत्या घरात घरोबा’ हा सिनेमा त्यापैकीच एक आहे. या चित्रपटाने त्याकाळी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. तसेच चित्रपटातील ‘किर्तीकर निवास’ हे चांगलेच चर्चेत होते. आता हा बंगला मुंबईत कुठे आहे? तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया…
‘आयत्या घरात घरोबा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केले आहे. या चित्रपटातील अशोक सराफ यांच्या गोपू काकाच्या भूमिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळवली. गोपू काकाचे संवाद आणि अभिनय आजही प्रेक्षकांच्या आठवणींमध्ये टिकून आहे. या सिनेमात अशोक सराफ यांच्यासोबत सुप्रिया पिळगावकर, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रशांत दामले, किशोरी शहाणे, राजेश्वरी सचदेव, सुधीर जोशी आणि जयराम कुलकर्णी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. साधी-सोपी कथा, उत्कृष्ट अभिनय आणि घरगुती वातावरण यामुळे हा चित्रपट कौटुंबिक प्रेक्षकांचा आवडता ठरला.
कुठे आहे किर्तीकर निवास?
या चित्रपटाचे बहुतेक शूटिंग मुंबईतील जुहू भागात असलेल्या किर्तीकर निवास या बंगल्यात झाले होते. हा बंगला केवळ शूटिंगचा सेट नव्हता, तर सिनेमातील एक महत्त्वाचा कॅरेक्टर होता. सुप्रिया आणि सचिन पिळगावकर यांनी एका मुलाखतीत याबाबत सांगितले होते की, त्या बंगल्यात आधी कोणताही मराठी चित्रपट शूट झालेला नव्हता. महागडा असल्यामुळे तिथे प्रामुख्याने हिंदी चित्रपटांचेच शूटिंग होत असे. तरीही त्यांनी हा बंगला निवडला, कारण सिनेमात श्रीमंती आणि मोठेपण दाखवण्यासाठी तो आवश्यक होता. सेट लावून तसे वातावरण तयार करता येणार नव्हते, म्हणून खऱ्या बंगल्यातच शूटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला.
श्रिया पिळगावकरची झलक
या आठवणींशी जोडलेला एक खास किस्सा म्हणजे त्यांच्या कन्येचा. त्यावेळी श्रिया पिळगावकर साधारण एक वर्षाची होती. तिचे नुकतेच जावळ काढण्यात आले होते आणि सिनेमाच्या एका शॉटमध्ये तिला दाखवण्यात आले होते. सुप्रिया आणि सचिन यांनी सांगितले की, हा क्षण त्यांच्यासाठी केवळ सिनेमाचा भाग नसून कौटुंबिक आठवणींचाही एक भाग बनला.
किर्तीकर निवास हा केवळ एक बंगला नसून ‘आयत्या घरात घरोबा’च्या यशाशी जोडलेला एक महत्त्वाचा दुवा आहे. आजही प्रेक्षक हा चित्रपट पाहताना त्या बंगल्यातील दृश्ये आठवतात. गोपू काकाची भूमिका, घरगुती वातावरण आणि या खास शूटिंगच्या आठवणींमुळे हा सिनेमा मराठी रसिकांच्या हृदयात कायमचा घर करून राहिला आहे. त्या काळातील हा प्रयत्न आजही सिनेमाच्या इतिहासात एक रंजक अध्याय म्हणून स्मरणात आहे.