‘गरीब कार्ड वापरून फेमस होऊ पाहणाऱ्या..’; सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’बद्दल काय म्हणाली ‘कोकण हार्टेड गर्ल’?

सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' हा चित्रपट पाहिल्यानंतर 'कोकण हार्टेड गर्ल' म्हणजेच इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरने भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. अंकिताने सूरजचा हा चित्रपट तीन-चार वेळा पाहिलाय. त्यानंतर तिने त्यावर मत व्यक्त केलंय.

गरीब कार्ड वापरून फेमस होऊ पाहणाऱ्या..; सूरज चव्हाणच्या झापुक झुपूकबद्दल काय म्हणाली कोकण हार्टेड गर्ल?
Suraj Chavan and Ankita Walawalkar
Image Credit source: Instagram
| Updated on: May 01, 2025 | 9:59 AM

‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाणने ‘झापुक झुपूक’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलंय. केदार शिंदे दिग्दर्शित हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळतोय. आता ‘बिग बॉस मराठी’ या शोमधील सूरजची खास मैत्रीण आणि इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर ऊर्फ ‘कोकण हार्टेड गर्ल’ने या चित्रपटाबद्दल एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने सूरजचा हा चित्रपट तीन ते चार पाहिल्याचं म्हटलंय. अंकिताची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

अंकिता वालावलकरची पोस्ट-

‘सूरजचा ‘झापुक झुपूक’ चित्रपट बघितला. मी आत्तापर्यंत 3-4 वेळा बघितला. खरंतर मी आता सोशल मीडियावर गरीब कार्ड वापरून फेमस होऊ पाहणाऱ्या प्रत्येकाला सांगू इच्छिते की सूरज फक्त गरीब आहे म्हणून आज त्या जागेवर नाहीये. ज्याला लिहिता वाचता येत नाही असा मुलगा, त्याने जे काम केलंय ना.. ते खरोखर कौतुकास पात्र आहे. त्याच्याकडून एखादी गोष्ट करून घेण्यात जास्त मेहनत आहे हे मला माहीत आहे. कारण 70 दिवस 24 तास एकत्र राहिलोय. तुम्ही तर एडिटेड बिग बॉस बघितलाय. जेव्हा बिग बॉसने दिलेल्या निकषांच्या आधारावर मी सूरजला बाद करत होते, तेव्हा मला जज केलं गेलं. पण उद्देश तोच होता की त्याने त्याच्या गोष्टी सुधाराव्यात. त्याला कळणं गरजेचं होतं की तो कुठे मागे पडतोय. त्यामुळे त्याच्याकडून चित्रपटासाठी आऊटपुट काढून घेणाऱ्या केदार सरांचं आणि टीमचं खूप कौतुक’, असं तिने लिहिलंय.

या पोस्टमध्ये तिने पुढे म्हटलंय, ‘मी आधी पण बोलले होते की इंडस्ट्रीमध्ये इन्फ्लुएन्सर, क्रिएटर आणि ॲक्टरमधे एक दरी आहेच. पण कलाकाराला जसा जात-धर्म नसतो, तसंच त्याला हे प्रेम सहानुभूतीपूर्वक मिळालं असं म्हणू पाहणाऱ्यांनी त्याचं कलाकार म्हणून काम पण पहावं. सिनेमा पाहून त्यावर भाष्य करा, न पाहता टीका करू नका. या चित्रपटाला प्रतिसाद कमी मिळाला तर त्याचं हेही कारण की सूरजचे फॅन्स गावाकडे आणि गावांमध्ये चित्रपटगृह नाहीत. काहींचं म्हणणं होत की त्याला ग्रुम करून चित्रपट बनवला पाहिजे होता. पण तशी इच्छा सूरजची पण हवी ना? म्हणून सूरज चव्हाण हे कॅरेक्टर आहे तसंच प्रेझेंट केलं गेलंय. त्याने जे काम केलंय त्यावर आपण भाष्य करूया.’

‘त्या मुलाने या चित्रपटात क्षमतेपेक्षा सुंदर काम केलंय. आपण चित्रपटांकडे चित्रपट म्हणूनच बघायला शिकुया. जर महाराष्ट्रानेच सूरजला जिंकवलंय तर महाराष्ट्र हा चित्रपट डोक्यावर घेईलच. ‘आख्याना’ माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा,’ अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत. अंकिताच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.