Kranti Redkar: चुकीच्या ओळखीमुळे माझं नाव..; स्पॉट फिक्सिंग प्रकरणावर क्रांती रेडकर स्पष्टच बोलली
Kranti Redkar: या काळात ती सोशल मीडियावर आपल्या कामाचे अपडेट्स देत होती. न्यायालयात जाण्यापासून ते कायदेशीर लढाईतील घडामोडींपर्यंत अनेक गोष्टी ती शेअर करत होती. या संपूर्ण अनुभवाने आपल्याला अधिक खंबीर बनवलं, असंही तिने मुलाखतीत सांगितलं.

Kranti Redkar: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री क्रांती रेडकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कारण ठरलं आहे ते 2013 मधील आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरण. या वादात क्रांती रेडकरचं नाव समोर आल्यानंतर त्यावेळी मोठी खळबळ उडाली होती. क्रिकेटपटू एस. श्रीसंत याच्याशी तिचं नाव जोडलं गेल्याच्या बातम्याही प्रसारित झाल्या होत्या. मात्र, आता या जुन्या प्रकरणी क्रांतीची भूमिका समोर आली आहे. चुकीच्या ओळखीमुळे माझं नाव या प्रकरणाशी जोडलं गेलं होतं आणि त्याचा मला मानसिक त्रास सहन करावा लागला, असं तिने स्पष्ट केलं आहे.
नेमकं काय होतं प्रकरण?
2013 मध्ये इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेदरम्यान स्पॉट फिक्सिंगचं प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणात क्रिकेटपटू एस. श्रीसंतसह काही खेळाडूंची नावं चर्चेत आली होती. या वादाची व्याप्ती वाढत असताना काही माध्यमांमध्ये क्रांती रेडकरचं नावही समोर आलं. तिचा श्रीसंतशी संबंध असल्याचा आणि ती त्याला भेटल्याचा दावा काही वृत्तांमध्ये करण्यात आला होता. मात्र, क्रांतीने त्यावेळीच या वृत्तांचं खंडन केलं होतं. माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं तिने स्पष्ट केलं. चुकीच्या व्यक्तीशी झालेल्या नावाच्या गोंधळामुळे आपल्याला या वादात ओढण्यात आल्याचंही तिने सांगितलं होतं.
क्रांतीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्या काळातील परिस्थितीची आठवण सांगितली. 2013 मध्ये तिचं नाव स्पॉट फिक्सिंग प्रकरणाशी जोडलं गेलं, तेव्हा ती कोकणातील कुडाळ याठिकाणी ‘काकण’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. विशेष म्हणजे, या चित्रपटातून ती दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत होती. दुसरीकडे, तिच्याबद्दलच्या बातम्या मुंबईत प्रसारित होत होत्या.
आजच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार लगेच आपली बाजू मांडू शकतात. मात्र, 2013 मध्ये इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर आजच्याइतका सहज नव्हता. त्यामुळे आपण नेमके कुठे आहोत आणि प्रत्यक्षात काय घडत आहे, हे तात्काळ लोकांपर्यंत पोहोचवणं कठीण होतं. या परिस्थितीमुळे आपली बाजू मांडताना अनेक अडचणी आल्याचं क्रांतीने सांगितलं.
या प्रकरणामुळे क्रांतीला मानसिक त्रास सहन करावा लागला. केवळ तिच्यावरच नव्हे, तर तिच्या कुटुंबावरही या वादाचा परिणाम झाला होता. त्यामुळे तिने शांत बसण्याऐवजी कायदेशीर मार्गाने लढा देण्याचा निर्णय घेतला. क्रांतीने एका वृत्तवाहिनीविरोधात मानहानीची केस दाखल केली होती. संबंधित वृत्तवाहिनीने तिची बाजू जाणून न घेता तिचं नाव या प्रकरणाशी जोडलं होतं. त्यामुळे तिने कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला, असं तिने स्पष्ट केलं.