राष्ट्रवादी शरद पवार गट एडीएसोबत येणार का? पाहा बावनकुळे नेमकं काय म्हणाले? चर्चेला उधाण
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीएसोबत येणार असल्याची चर्चा सूरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीएसोबत येणार असल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चेवर राजकीय वर्तुळातून देखील विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गट डिलिमिटेशन बिलाला देखील पाठिंबा देण्याची शक्यता आहे. यावर आता भाजप मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी मोठं विधान केलं आहे. बावनकुळे यांच्या या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. जर कोणी आमच्यासोबत आले तर आम्ही त्याचं स्वागत करू, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले बावनकुळे?
जर कोणी आमच्यासोबत आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू. आम्ही आमच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम करतो. त्यामुळे विकसीत भारतासाठी पंतप्रधान मोदी यांना साथ देण्यासाठी जर कोणी येत असेल तर आम्ही त्यांचं नक्कीच स्वागत करू, असं यावेळी बावनकुळे यांनी म्हटलं आहे. दरम्यान डिलिमिटेशन बिलावर बोलताना ते म्हणाले की, जेवढा छोटा मतदारसंघ तेवढं चांगलं काम करता येणार. डिलिमिटेशन झालं पाहिजे, अशीच सर्वांची इच्छा आहे. तीच राज्य आणि देशाची देखील गरज आहे, असंही यावेळी बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सरकारने मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर देखील त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना दर महिन्याला प्रत्येकी पाच किलो धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. याचसोबत राज्यातील जलसाठे, पिकपाणी आणि दुष्काळावर देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली, असंही यावेळी बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
पुणे गोळीबार प्रकरणावर प्रतिक्रिया
दरम्यान आज पुण्यात भरदिवसा न्यायालयाच्या परिसरात गोळीबार झाला आहे, आधी गोळीबार करण्यात आला, त्यानंतर कोयत्याने हल्ला करण्यात आला. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. यावर देखील यावेळी बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरोपींना सोडणार नाही. ते जिथे असतील तिथून शोधून काढू, मुख्यमंत्र्यांनी कडक सूचना दिल्या आहेत, असंही ते यावेळी म्हणाले.
