Lalbaugcha Raja Visarjan 2025 : 33 तासांनंतर लालबागचा राजाचं विसर्जन, गुजरातच्या तराफ्यावरून मराठी अभिनेत्रीचा टोला

तब्बल 33 तासांनंतर लालबागचा राजाचं विसर्जन पार पडलं. रविवारी गिरगाव चौपाटीवरच हे विसर्जन जवळपास 13 ते 14 तास रखडलं होतं. अनेक प्रयत्नांनंतरही गुजरातवरून आणलेल्या अत्याधुनिक तराफ्यावर मूर्ती चढवण्यास अडचण येत होती.

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : 33 तासांनंतर लालबागचा राजाचं विसर्जन, गुजरातच्या तराफ्यावरून मराठी अभिनेत्रीचा टोला
Lalbaugcha Raja Visarjan 2025
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 08, 2025 | 11:36 AM

ढोल-ताशांच्या गजरात, भावपूर्ण वातावरणात निघालेली लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक चौपाटीवरच कित्येक तास रखडली. समुद्राला आलेल्या भरतीमुळे गणेशमूर्ती अत्याधुनिक तराफ्यावर चढविताना अडचण निर्माण झाली. त्यामुळे तब्बल 33 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं. राजाची विसर्जन मिरवणूक रविवारी सकाळी साडेसात वाजता गिरगाव चौपाटीवर दाखल झाली. मात्र भरतीमुळे अत्याधुनिक तराफा तरंगत राहिला आणि लालबागच्या राजाची ट्रॉली पाण्याखाली राहिली. त्यामुळे लालबागच्या राजाची मूर्ती ट्रॉलीवरून अत्याधुनिक तराफ्यावर चढवताना अडचणी निर्माण झाल्या. अखेर मंडळाने पाणी ओसरण्याची वाट पाहिली आणि कोळी बांधवांशी चर्चा करून भरतीदरम्यान विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला.

हा सगळा प्रकार सुरू असताना मंडाळाचे कार्यकर्ते आणि चौपाटीवर असलेल्या नागरिकांमध्ये घालमेल सुरू होती. दरवर्षीच्या तराफ्याला डावलून गुजरातहून तराफा आणण्याची गरजच काय होती, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत होता. अशातच यावरून एका मराठमोळ्या अभिनेत्रीने लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे. ‘बहुतेक गुजरातवरून विसर्जनासाठी आणलेला महागडा तराफा लालबागचा राजाला आवडला नसावा. राजाला आपल्या कोळी बांधवांची सवय आहे ना, काय करणार,’ असा टोला अभिनेत्री आरती सोळंकीने लगावला आहे. गुजरावरून आणलेल्या तराफ्याबद्दल सोशल मीडियावरही नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया समोर येत होत्या.

आरती सोळंकीची पोस्ट-

गिरगाव चौपाटीवरील पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर कोळी बांधवांच्या साथीने संध्याकाळी 6 ते 6.30 वाजताच्या सुमारास लालबागच्या राजाची मूर्ती ट्रॉलीवरून अत्याधुनिक तराफ्यावर चढवण्यात यश आलं. त्यानंतरही पुन्हा काही काळ वाट पहावी लागली आणि अखेर 8 वाजून 15 मिनिटांनी आरती करण्यात आली. चौपाटीवरील 13 ते 14 तासांच्या प्रतीक्षेनंतर रविवारी रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं.

‘यंदा विसर्जन उशीर झाल्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो. लालबागचा राजा कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असल्यामुळे त्याचं विसर्जन धोकादायक परिस्थितीत न करता थोडं थांबून दरवर्षीप्रमाणे शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थित करण्याचा निर्णय घेतला’, अशी प्रतिक्रिया लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी दिली.