एका शब्दासाठी 17 रिटेक! लता मंगेशकरांना आली चक्कर; मधुबालावर चित्रित हे गाणं ठरलं एव्हरग्रीन

सौंदर्यवती अभिनेत्री मधुबाला हिच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या या सदाबहार गाण्याचा एक खास किस्सा आहे, ज्यामुळे हे गाणं बॉलिवूडच्या इतिहासात अजरामर झालं.

एका शब्दासाठी 17 रिटेक! लता मंगेशकरांना आली चक्कर; मधुबालावर चित्रित हे गाणं ठरलं एव्हरग्रीन
| Updated on: Aug 25, 2026 | 10:03 PM

ज्येष्ठ गायिका, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना ‘गानकोकिळा’ म्हटलं जायचं. त्यांच्या शेकडो गाण्यांनी रसिकांना भुरळ घातली, त्यांच्या सुमधुर आवाजाचे लाखो चाहते आहेत. मात्र सुरांच्या या सम्राज्ञीला हे पद, हे यश असंच मिळालं नाही. त्यापाठी त्यांची अविरत कठोर मेहनत आणि सातत्य यांचाही मोठा वाटा आहे. त्यांच्या मेहनतीच्या, अनेक कहाण्या आहेत. असाच एक किस्सा आहे ‘अमर’ चित्रपटातील एका गाण्याच्या रेकॉर्डिंगचा.. त्या दिवशी लता मंगेशकर यांना एकच गाणं वारंवार म्हणावं लागलं. पण संगीतकार नौशाद दरवेळी रेकॉर्डिंग थांबवायचे. कारण त्या गाण्यात अशी एक बारीक जागा होती जी त्यांना हवी होती आणि त्यासाठी लतादिदी वारंवार प्रयत्न करत होत्या. त्या छोट्याशा आणि बंद स्टुडिओत प्रचंड उकडत होतं. जवळपास 17 रिटेक्सनंतर लता मंगेशकर एवढ्या थकल्या की त्यांची तब्येतच बिघडली आणि त्यांना चक्कर येत होती, असं सांगितलं जातं.

‘अमर’ चित्रपटासाठी सुरू होतं गाण्याचं रेकॉर्डिंग

Loading...

हा किस्सा 1954 साली प्रदर्शित झालेल्या ‘अमर’ या चित्रपटाशी संबंधित आहे. महबूब खान यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात दिलीप कुमार आणि मधुबाला यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. तर नौशाद यांनी चित्रपटातील गाण्यांना संगीत दिलं होतं. ज्या गाण्याच्या रेकॉर्डिंगदरम्यान हा प्रकार घडला, ते गाणं होतं ‘तेरे सदके बलम, न कर कोई गम’. त्याचे बोल शकील बदायूनी यांनी लिहिले आणि लता मंगेशकर यांच्या आवाजत ते गाणं स्वरबद्ध झालं. मधुबाला यांच्यावर हे गाणं शूट करण्यात आलं होतं.

एकाच शब्दावर वारंवार थांबत होतं रेकॉर्डिंग

असं सांगितलं जातं की, लता मंगेशकर हे गाणं रेकॉर्ड करत होत्या, पण नौशाद त्यांना मध्येच थांबवायचे. एका विशिष्ट शब्दाच्या उच्चारात किंवा गायनात त्यांना अपेक्षित असलेली अचूकता काही सापडत नव्हती. नौशाद त्यांना विशेषतः ‘ऐ’ हा शब्द थोडा वेगळ्या पद्धतीने लांबवून म्हणण्यास सांगत होते. मात्र गाणं गाताना कधी लता दिदी तो शब्द जास्त लांबवायच्या , तर कधी गाण्यातील दुसऱ्या एखाद्या बारकाव्यामुळे नौशाद यांचं समाधान व्हायचं नाही. त्यामुळे गाण्याचे रेकॉर्डिंग वारंवार सुरू व्हायचं आणि पुन्हा थांबायचं.

17 रिटेक्स नंतर आली चक्कर

सांगायचं झालं तर त्या काळातील रेकॉर्डिंग स्टुडिओ हे काही आजच्यासारखे आलिशान आणि आरामदायी नव्हते. ज्या खोलीत हे रेकॉर्डिंग सुरू होतं, तिथे ना पंखा होता ना एसी. ती खोलीही अतिशय लहान आणि बंद होती. सतत गात राहिल्यामुळे लता मंगेशकर घामाने पूर्ण भिजून गेल्या होत्या. तोपर्यंत गाण्याचे जवळपास 17 रिटेक्स झाले होते. वारंवार प्रयत्न करू लता दिदी खूप थकल्या होत्या. अखेर त्यांची तब्येत बिघडली, त्यांना चक्कर आली आणि थकून त्या तिथेच खुर्चीवर धपकन बसल्या.

10 पैकी 7 गाण्यांना लता दिदींचा आवाज

‘अमर’ चित्रपटाच्या संगीतामध्ये लता मंगेशकर यांच्या आवाजाचं मोठं योगदान होतं. चित्रपटातील 10 गाण्यांपैकी 7 गाण्यांना त्यांचा स्वर लाभला आणि ‘तेरे सदके बलम, न कर कोई गम’ हे त्यातील लोकप्रिय गाण्यांपैकी एक ठरलं.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us