मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुले यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. तरुण कोवळ्या मुला-मुलींची डोकी फुटताना बघून जर कोणाला आनंदाच्या उकळ्या फुटत असतील, तर हा समाज दुर्धर आजारी पडलाय, असं ते म्हणाले.

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त
विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर समीर चौघुलेंची पोस्ट
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 23, 2026 | 10:24 AM

नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत शेकडो विद्यार्थ्यांनी संसद भवनावर धडक मोर्चा काढला होता. या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या होत्या. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचे असंख्य व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यावर सेलिब्रिटींकडून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर चौघुले यांनीही फेसबुकवर भलीमोठी पोस्ट लिहित आंदोलनावर हसणाऱ्यांना सुनावलं आहे.

समीर चौघुलेंची पोस्ट-

‘आता एकाची पोस्ट वाचली.. ‘परीक्षेचा पेपर लीक झाला म्हणून आत्महत्या केलेल्या मुलांना असंच पाहिजे. जे स्वतःचा जीव नाही वाचवू शकत ते डॉक्टर होऊन उद्या लोकांचे जीव काय वाचवणार?’ सुन्न झालो.. आपण माणसं नाही राहिलो. झोंबी झालो आहोत. हा कोणता उन्माद भरलाय आपल्या सर्वांच्या डोक्यात? त्या तरुण कोवळ्या मुला-मुलींची डोकी फुटताना बघून जर कोणाला आनंदाच्या उकळ्या फुटत असतील किंवा कोणी त्या क्लिप्स एंजॉय करत असतील किंवा ‘असंच पाहिजे या मुलांना’ हा आनंद त्यांना होत असेल तर हा समाज खूप दुर्धर आजारी पडला आहे,’ अशा शब्दांत त्यांनी राग व्यक्त केला आहे.

या पोस्टमध्ये चौघुलेंनी पुढे लिहिलं, ‘प्रत्येक गोष्ट संवादाने 100 टक्के सोडवता येते. चर्चा व्हायला हवी होती. तरुण कोवळ्या मुलांवर अत्यंत क्रूरतेनं बरसलेल्या लाठ्या खूप व्यथित करतात. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही बाजूने हिंसा होता कामा नये. मुलांचं म्हणणं, समस्या यांना अग्रक्रम दिलाच पाहिजे. काही टिप्स- 1- कलाकारांनी त्यांच्या कामावर लक्ष द्यावं, नको त्या भानगडीत पडू नये वगैरे सूचना द्यायला जाऊ नये. तुम्हाला सर्वांना तोच नियम लागू पडतो. मी ही तुमच्या सारखाच या देशाचा नागरिक आहे. तुम्हीही हिरिरीने मत मांडता, मी ही मांडतोय. 2- पहलगामच्यावेळी काय वाचा बसली होती का? त्याही वेळी व्यक्त झालोच होतो. त्यामुळे त्यावेळी का नाही बोललात कॅटेगरीत बोलू नये. 3- तुम्हाला आजपासून अनफॉलो करतो – जशी आपली इच्छा.. आनंदी रहा तुमचं भल होऊ दे. फक्त शांतपणे अनफॉलो करा. कमेंट करून सांगू नका. 4- मनातील द्वेषाचा निचरा मोकळा करायला वेगळी जागा शोधा. गलिच्छ शिवराळ हिणकस भाषा कृपया इथे वापरू नका. 5- किती पैसे मिळाले या पोस्टसाठी? – तुम्हाला मिळतात त्यापेक्षा थोडे जास्त.’

समीर चौघुले यांनी ट्रोलर्सनाही या पोस्टद्वारे सडेतोड उत्तर दिलं आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us