जंतर-मंतरवरील आंदोलनामुळे अमर झालं 8 वर्षे जुनं गाणं; लाखो जेन-झी बनवतायत रील्स

दिल्लीतल्या जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन तर संपलं आहे, परंतु त्यामुळे आठ वर्षांपूर्वीचं एक गाणं अमर झालं आहे. या गाण्यावरून आता जेन-झी रील्स बनवत आहेत. हे गाणं कोणतं, ते जाणून घ्या...

जंतर-मंतरवरील आंदोलनामुळे अमर झालं 8 वर्षे जुनं गाणं; लाखो जेन-झी बनवतायत रील्स
रसिका दुग्गल
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 26, 2026 | 3:12 PM

36 दिवसांनंतर दिल्लीतील जंतर-मंतर इथलं विद्यार्थ्यांचं आंदोलन संपुष्टात आलं आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) नेतृत्वाखाली तरुणवर्ग हे आंदोलन करत होतं. बघता बघता हे आंदोलन देशव्यापी बनलं आणि अखेर प्रधानांना राजीनामा द्यावा लागला. या सर्व घडामोडींदरम्यान आठ वर्षे जुनं एक गाणं तुफान चर्चेत आलं आहे. या गाण्यावरून असंख्य नेटकरी रील्स बनवत आहेत. जंतर-मंतरवरील आंदोलन तर संपलंय, परंतु जाता जाता या आंदोलनाने या गाण्याला अमर केलं आहे. 2018 मध्ये जेव्हा हे गाणं प्रदर्शित झालं होतं, तेव्हा त्याला एवढी लोकप्रियता मिळाली नव्हती, जेवढी आता मिळत आहे.

सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली असंख्य तरुण जंतर-मंतर याठिकाणी जमले. जेन-झींच्या या आंदोलनात इन्स्टाग्राम रील्सची मोठी भूमिका होती, हे सर्वजण मान्य करतील. आंदोलनाचे असंख्य व्हिडीओ विविध गाणी लावून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. याच व्हिडीओंद्वारे विद्यार्थ्यांचं हे आंदोलन अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहोचलं होतं. या काळात असंख्य युजर्स वेगवेगळी गाणी लावून रील्स व्हिडीओ बनवत होते आणि त्यांना लाखोंमध्ये लाइक्स, व्ह्यूज मिळत होते. या सर्वांत एका गाण्याने सर्वाधिक छाप सोडली आहे. हे गाणं अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीच्या ‘मंटो’ या चित्रपटातील आहे.

पहा गाणं-

नंदिता दास दिग्दर्शित ‘मंटो’ या चित्रपटातील ‘बोल के लब आझाद है’ हे गाणं जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या व्हिडीओंवर अधिकाधिक वापरलं जात आहे. जर तुम्ही इन्स्टाग्राम अकाऊंट उघडून या आंदोलनांचे रील्स पाहिले, तर त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला हेच गाणं सर्वाधिक ऐकायला मिळेल. आठ वर्षांपूर्वी या गाण्याला तेवढी लोकप्रियता मिळाली नव्हती, मात्र आता हे गाणं इन्स्टाग्रामवर ट्रेंड होत आहे. बोल के लब आझाद है.. हे गाणं नवाजुद्दीन सिद्दिकी आणि रसिका दुग्गल यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे.

‘मंटो’ या चित्रपटातील हे गाणं प्रसिद्ध गायक राशिद खान आणि विद्या शाह यांनी गायलं आहे. तर त्याचे संगीतकार स्नेह खानवलकर आहेत. या गाण्याचे बोल दिग्गज शायर फैज अहमद यांनी लिहिलेल्या ‘बोल के लब आझाद है तेरे’ यातून घेण्यात आले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us