
मुंबई : देशभरात मोठ्या उत्साहात होळी सण साजरा केला जात आहे. सेलिब्रिटींनाही होळीचा आनंद घेतलेला पाहायला मिळाला. प्रत्येकजण आपल्या सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत. मराठी अभिनेता कुशल बद्रिके याने फोटो शेअर करत एक भावनिक पोस्ट केली आहे. कुशलने आपल्या बालपणील चाळीतील होळीची आठवण सांगितली आहे.
माझ्या आयुष्याची होळी गेली कित्येक वर्ष “फ्लॅट” संस्कृतीत पेटत्ये, पण माझी खरी होळी रंगली ती माझ्या बालपणी आमच्या “चाळीत”. माझे पप्पा पहाटे चारला उठायचे आणि दिड-दोनशे फुगे पाण्याने भरून ठेवायचे. मग रंग भरल्या पिचकारीची बंदूक आणि फुग्यांचे बॉम्ब घेऊन आमची वानरसेना दिसेल त्याच्यावर तुटून पडायची. त्या वेळी जातीचे रंग थोडे फिकट आणि होळीचे रंग थोडे गडद होते, म्हणून कदाचित जगण्यात जे रंग उतरले त्याने अख्खं आयुष्य रंगीत करुन टाकल्याचं कुशल बद्रिके याने म्हटलं आहे.
आता मुलांना फुगे भरून देताना गाठी मारून गुलाबी झालेलं “पप्पांचं बोट” आपल्याच हाताला फुटलंय असं वाटतं. आता होळीत आपल्याला फुगे भरून देणारं कुणी नाही ही जाणीव ठुसठुसत राहते बोटभर, अशी भावनिक पोस्ट बद्रिके याने केली आहे.
दरम्यान, कुशल बद्रिके याने पोस्टसोबत कुटूंबाचे फोटोही पोस्ट केले आहेत. कुशल याची पोस्ट सोशळ मीडियावर व्हायरल होत असलेली पाहायला मिळत आहे. अनेकांनी कमेंट करत जुने दिवस आठवले, ते गोल्डन दिवस असल्याचं त्याच्या चाहत्यांनी म्हटलं आहे.