
Girija Oak : मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री गिरिजा ओक सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. ‘द वूमन इन द ब्लू साडी’ या शीर्षकाखाली शेअर झालेल्या तिच्या काही सुंदर फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून तिच्या सिंपल, संस्कारी आणि सौंदर्याच सर्वत्र कौतुक होत आहे. पारंपरिक साडीतल्या या फोटोंमुळे गिरिजा पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
साडीमधील सौंदर्य, साधेपणा आणि गिरीजा ओकची हटके स्टाइल ही नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तिच्या व्हायरल फोटोंवर चाहत्यांनी खूपच सुंदर, खरी मराठी नायिका, ग्रेसफुल आणि क्लासी अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, या फोटोंसोबत तिचे काही AI बनावट फोटो देखील यादरम्यान व्हायरल करण्यात आले ज्यामुळे ती नाराज देखील झाली.
गिरिजाने एका मुलाखतीत सांगितलं की, लोकांकडून मिळणारं प्रेम आणि कौतुक पाहून नक्कीच आनंद होतो, मात्र खोट्या आणि AI फोटोंमुळे त्रासही होतो. सोशल मीडियाच्या या दोन्ही बाजूंविषयी तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
कमी वयातच अभिनय क्षेत्रात पदार्पण
सध्या 37 वर्षांची असलेली गिरिजा ओक हिने अवघ्या 15 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. अत्यंत कमी वयात अभिनयाची सुरुवात करून आज तिने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठी सिनेसृष्टीत यश मिळवल्यानंतर तिने बॉलिवूडमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
गिरिजा ओकने आमिर खान आणि शाहरुख खान यांसारख्या मोठ्या सुपरस्टार कलाकारांसोबत काम केलं असून तिच्या अभिनयामुळे ती प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. तिचा साधा स्वभाव आणि नैसर्गिक अभिनय हीच तिची खरी ताकद मानली जाते.
गिरिजा ओकचं शिक्षण
अभिनयासोबतच गिरिजा ओक शिक्षणातही तितकीच हुशार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिने मुंबईतील ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स येथून बायोटेक्नॉलॉजी विषयात पदवी प्राप्त केली आहे. याशिवाय तिने बिझनेस मॅनेजमेंटचेही शिक्षण घेतले आहे. अभिनय आणि शिक्षण यांचा उत्तम समतोल साधत तिने आपली कारकीर्द घडवली आहे. दरम्यान, तिचा सोशल मीडियावर देखील मोठा चाहता वर्ग असून ती नेहमी चाहत्यांना वेगवेगळ्या लुकमधील फोटो शेअर करत असते.