…म्हणून मी फटाके फोडणं पूर्णपणे थांबवलं, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने का घेतला असा निर्णय?

प्राप्ती रेडकर आणि महिमा म्हात्रे, या मराठी अभिनेत्रींनी दिवाळीचे खास अनुभव सांगितले. प्राप्ती यंदा कुटुंबियांना वेळ देणार असून लहानपणीच्या आठवणींना उजाळा देते. तिने वायू प्रदूषण टाळण्यासाठी फटाके फोडणे बंद केले आहे.

...म्हणून मी फटाके फोडणं पूर्णपणे थांबवलं, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने का घेतला असा निर्णय?
Updated on: Oct 22, 2025 | 4:12 PM

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि कुटुंबासोबत जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा सण. अनेक कलाकार त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत दिवाळी आपल्या कुटुंबासोबत साजरी करतात. झी मराठी वाहिनीवरील सावळ्याची जणू सावली मालिकेतील सावलीची भूमिका साकारणारी प्राप्ती रेडकर आणि तुला जपणार आहे मालिकेतील मीराची भूमिका साकारणारी अभिनेत्री महिमा म्हात्रे यांनी त्यांच्या दिवाळीच्या खास आठवणी सांगितल्या आहेत.

झी मराठीवरील सावळ्याची जणू सावली मालिकेतील सावलीची भूमिका साकारणारी प्राप्ती रेडकरने नुकतंच एक मुलाखत दिली. यात तिने यंदा जर सुट्टी मिळाली तर आपल्या आई-वडिलांसोबत दिवाळी साजरी करणार आहे. लहानपणी नानीच्या घरी पहाटे ४ वाजता फटाका वाजवण्याची लहान मुलांमध्ये चढाओढ असायची. त्यावेळी नवीन कपडे घालून मरीन लाइन्सला जाणं हे फार जिव्हाळ्याचं आहे. मात्र, गेल्या ५ वर्षांपासून मी फटाके फोडणं पूर्णपणे थांबवलं आहे. वायूप्रदूषण खूप वाढलं आहे. माझ्या छोट्याशा कृतीने निसर्ग वाचत असेल तर का नाही?” हा विचार करून मी हा निर्णय घेतला, असे प्राप्ती म्हणाली.

माझं व्यक्तिमत्व फुलबाजी आणि चकरीसारखं

फटाके नसले तरी, कुटुंबासोबत फराळ करणे, नातेवाईकांना भेटणे आणि फराळ बनवण्याच्या प्रक्रियेत सहभागी होणे हा तिच्यासाठी दिवाळीचा खास भाग आहे. माझं व्यक्तिमत्व फुलबाजी आणि चकरीसारखं आहे. फुलबाजीसारखं तडतड करत मी सेटवर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत फिरत असते, असेही प्राप्तनीने म्हटले आहे.

भाऊबीजेच्या दिवशी कुठेही असलो तरी एकत्र

तसेच ‘तुला जपणार आहे’ मालिकेतील ‘मीरा’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री महिमा म्हात्रे पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करते. नरक चतुर्दशीला लवकर उठून उटणं लावणं, दिवे लावणं, फराळ, देवदर्शन आणि नातेवाईकांना भेटणं याने तिच्या दिवाळीची मजा वाढते. शूटिंगमुळे कुटुंबाला भेटायला वेळ मिळत नसल्याने महिमा यंदा कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यास खूप उत्सुक आहे. दरवर्षी आम्हा भावंडांची एक परंपरा आहे की आम्ही भाऊबीजेच्या दिवशी कुठेही असलो तरी एकत्र येतो. माझा भाऊ ध्रुव माझ्या खूप जवळचा आहे. ध्रुव आणि माझी तन्वी ताई दोघांनीही मला खूप साथ दिली, मार्गदर्शन, कौतुक केलं आणि मला माझ्या क्षेत्रात पुढे जाण्यास मदत केली., असे महिमाने सांगितले.