Pradeep Patwardhan: प्रदीप पटवर्धन यांच्या ‘मोरुची मावशी’चा किस्सा; भरत जाधव, केदार शिंदेही मनमुराद हसले

| Updated on: Aug 09, 2022 | 10:28 AM

2018 मध्ये 'अस्सल पाहुणे इरसाल नमुने' या कार्यक्रमात त्यांनी भरत जाधव आणि केदार शिंदे (Kedar Shinde) यांच्यासोबत हजेरी लावली होती. या कार्यक्रमात पटवर्धन यांचे खास मित्र आणि अभिनेते विजय पाटकर यांचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला होता.

Pradeep Patwardhan: प्रदीप पटवर्धन यांच्या मोरुची मावशीचा किस्सा; भरत जाधव, केदार शिंदेही मनमुराद हसले
Pradeep Patwardhan: प्रदीप पटवर्धन यांच्या 'मोरुची मावशी'चा किस्सा
Image Credit source: Instagram
Follow us on

आपल्या दमदार अभिनयकौशल्याने सिने आणि नाट्यरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan) यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. प्रदीप पटवर्धन यांच्या निधनाने मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांची ‘मोरूची मावशी’ (Moruchi Mavshi) या नाटकातील भूमिका अत्यंत गाजली होती. याशिवाय त्यांनी इतर अनेक नाटकं आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. 2018 मध्ये ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमात त्यांनी भरत जाधव आणि केदार शिंदे (Kedar Shinde) यांच्यासोबत हजेरी लावली होती. या कार्यक्रमात पटवर्धन यांचे खास मित्र आणि अभिनेते विजय पाटकर यांचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला होता. या व्हिडीओच्या माध्यमातून पाटकरांनी मित्राच्या अनेक आठवणी जागवल्या होत्या.

पाटकर या व्हिडीओत गमतीने म्हणाले, “प्रदीपची एक खास क्वालिटी म्हणजे त्याचं बिझनेस माईंड. त्या काळात मोरूची मावशी हे नाटक हाऊसफुल चालत होतं. सुधीर भटांकडून जो पाच-दहा तिकिटं घ्यायचा आणि ते ब्लॅकने विकायचा. नाटकाची नाईट आणि वरचे हे पैसे. कुठल्या नटाला हे सुचेल सांगा.” हे ऐकून कार्यक्रमाचे सूत्रसंचावक मकरंद अनासपुरेसह केदार शिंदे आणि भरत जाधव मनमुराद हसले.

प्रदीप पटवर्धन आपलं म्हणणं मांडत पुढे म्हणाले, “अरे मी कशाला तिकिटं ब्लॅकने विकेन? चांगली नोकरी करत होतो मी. मला ब्लॅकने तिकिटं विकायची काय गरज? माझ्या एण्ट्रीनेच मोरूची मावशी हे नाटक सुरू होतं. तर मी नाटकात एण्ट्री घेऊ का खाली ब्लॅकमध्ये तिकिटं विकत बसू?” विजय पाटकर हे मस्करी करत असल्याचं त्यांनी सगळ्यांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केला.

हे सुद्धा वाचा

प्रदीप पटवर्धन हे गिरगावमध्ये स्थायिक होते. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाविद्यालयापासूनच त्यांनी एकांकिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर ते व्यावसायिक नाटकांकडे वळले. त्यांनी नवरा माझा नवसाचा, लावू का लाथ या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या होत्या.