
सध्या पावसाळा सुरु आहे. त्यामुळे मुंबईत बऱ्याच ठिकाणी साप आढळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. कधी हेल्मेटमध्ये, कधी गाडीच्या डिक्कीमध्ये, तर कधी अक्षरश: शूजमध्ये साप आढळल्याचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. त्यामुळे नागरिकांमध्ये सापांबद्दल भीती निर्माण झाली आहे. त्यातच आता प्रसिद्ध संगीतकार आणि दिग्दर्शक अवधूत गुप्ते राहत असलेल्या परिसरात दोनदा अजगर आढळल्याची घटना समोर आली आहे. याबद्दल स्वत: अवधूत गुप्तेने पोस्ट करत माहिती दिली आहे.
अवधूत गुप्ते हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच अवधूत गुप्तने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यात तो राहत असलेल्या परिसरात साप आढळल्याचे पाहायला मिळत आहे. त्या सापाचे सर्पमित्रांनी कशाप्रकारे रेस्क्यू केले, याचा एक व्हिडीओही त्याने शेअर केला आहे.
मुंबईतल्या घरांमध्ये भिंतीवर ‘पाल‘ दिसली तरी शेजार पाजाऱ्यांना बोलवून “ऐऽऽ!! ऊऽऽ!!” चा दंगा करणाऱ्यांनी आमच्या बोरिवलीच्या श्रीकृष्ण नगर परिसरामध्य गेल्या दोन दिवसात मिळालेले हे दोन अजगर नक्की पहावेत! माकडांबरोबर तर आमचे सहजीवनच. परंतु, कधी बिबट्या तर कधी अजगरासारखा पाहुणा आमच्या कॉलनीमध्ये आला, की कृष्णनगर वासियांचा उत्साह हा अक्षरशः सण-सोहळ्यासारखा असतो! अर्थात आमच्यावर संस्कारच निसर्ग प्रेमाचे. ते आमच्या घरात येत नसून, आम्हीच त्यांच्या घरात घर बांधले आहे ह्याची जाणीव प्रत्येक नगरवासीयाला कायम असते. त्यामुळे ह्या दोन अजगरांना देखील सर्पप्रेमींच्या मदतीने त्यांच्या इष्ट स्थळी पुनश्च पोहोचवण्यात आले. ही पोस्ट कुठल्याही वन अधिकाऱ्याने किंवा वनविभागाने कुठलीही कारवाई करावी यासाठी नसून, आमच्या कृष्णनगराचे कौतुक करण्यासाठी आहे. त्याचप्रमाणे कृष्ण नगर आणि आजूबाजूच्या परिसरात नव्याने विस्थापित होणाऱ्या नव्या शेजाऱ्यांचे स्वागत करत असतानाच त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्यासाठी आहे. जय श्री कृष्ण नगर!! जय बोरिवली पूर्व!!, असे अवधूत गुप्तेने म्हटले आहे.
त्याच्या या पोस्टवर असंख्य लोकांनी कमेंट केल्या आहेत. काय फोटो काढलाय, जबरदस्त आणि त्या अजगराचे एक्सप्रेशन लाईक तुम्ही आमच्या जागा खाल्या मग आम्ही तुम्हाला खाणारचं ना? असे एकाने म्हटले आहे. तर काहींनी तुम्ही सांभाळून राहा, काळजी घ्या असा सल्ला त्याच्या चाहत्यांनी दिला आहे.