Sachin Tendulkar : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण, आशा भोसलेंचं ते गिफ्ट…

सचिन तेंडुलकरने दिवंगत गायिका आशा भोसले यांच्यासोबतची एक खास आठवण शेअर केली आहे. ३६ वर्षांपूर्वी आशाताईंनी त्याला 'जिप्सी किंग्ज'च्या सीडी भेट दिल्या होत्या, ज्यामुळे संगीताकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलला. अलीकडेच सचिनला एका पार्टीत 'जिप्सी किंग्ज'च्या सदस्यांना भेटण्याची संधी मिळाली, जी त्याच्यासाठी एक अविस्मरणीय बाब होती.

Sachin Tendulkar : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण, आशा भोसलेंचं ते गिफ्ट...
सचिन तेंडुलकर - आशा भोसले
| Updated on: Jul 02, 2026 | 8:29 AM

क्रिकेटचा देव समजला जाणारा, लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेला, भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर याचं नाव उच्चारलं की अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमलतं. सचिन हा चाहत्यांशी कनेक्टेड असतो, सशोल मीडियावरही तको बऱ्यापैकी ॲक्टिव्ह असतो. नुकतीच सचिन तेंडुलकरने एक खास पोस्ट शेअर केली असून ती आहे दिवंगत ज्येष्ठ गायिक आशा भोसले यांच्याशी निगडीत. सुमारे 36 वर्षांपूर्वी आशा भोसले यांनी त्याला अशी एक भेट दिली होती, ज्यामुळे संगीत ऐकण्याबाबतचा त्याचा दृष्टिकोनच बदलून गेला, असं सचिनने या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. यासोबतचन सचिनने पोस्टमध्ये काही फोटो आणि एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. या फोटोंमध्ये मास्टर ब्लास्टर हा प्रसिद्ध फ्रेंच म्युझिक ग्रुप ‘जिप्सी किंग्स’च्या सदस्यांसोबत दिसतोय. एका फोटोत तर तो निकोलस रेयेसशी बोलताना दिसला, तर दुसऱ्या फोटोत तो सर्व कलाकारांसोबत हसतमुखाने पोझ देत होता. त्याच्या या पोस्टवर आणि फोटोवर लाखो लाईक्सचा आणि शेकडो कमेंट्सचा वर्षाव झालाय.

काय लिहीलयं सचिन तेंडुलकरने ?

या फोटो आणि व्हिडिओंसोबतच्या कॅप्शनमध्ये सचिनने लिहिलं, “1990 साली आशा ताईंनी मला ‘जिप्सी किंग्स’च्या (Gipsy Kings) दोन सीडी भेट दिल्या होत्या. ते अल्बम्स ऐकल्यानंतर मी त्या ग्रुपचा मोठा चाहता झालो आणि अनेक वर्षं त्यांची गाणी ऐकत होतो. जवळपास ३६ वर्षांनंतर, एका मित्राच्या ‘समर पार्टी’मध्ये मी या ग्रुपच्या सदस्यांना भेटलो. माझ्यासाठी ही एक सुखद आणि अनपेक्षित भेट होती.” असं त्याने नमूद केलं. “आयुष्यात असे काही क्षण असतात ज्यांची आपण अनेक वर्षे वाट पाहत असतो; पण जेव्हा ते अखेर येतात, तेव्हा त्यातून मिळणारा आनंद शब्दांत मांडता येत नाही.” असंही त्याने या पोस्टच्या शेवटी लिहीलं. त्याचं हे विधान आणइ फोटो चाहत्यांना खूप आवडले असून अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत.

 

अतिशय व्हर्सेटाईल, हजारो गाणी लीलया गाणाऱ्या, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं यावर्षी , 12 एप्रिल रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालं. अनेक अवयव निकामी झाल्यामुळे त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चित्रपट, संगीत, राजकारण आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आशा भोसले यांना अंतिम निरोप दिला.

आशा भोसले यांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले. 2000 साली त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान असलेल्या ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने गौरवण्यात आले, तर 2008 मध्ये त्यांना देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या ‘पद्मविभूषण’ने सन्मानित करण्यात आलं होतं. सचिन आणि आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. मार्च महिन्यात सचिनच्या लेकाचं, अर्जुन तेंडुलकर याच लग्न झालं, तेव्हाही त्या वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून उपस्थित होत्या. आशा भोसले यांच्या निधनानंतर सचिन हा पत्नी अंजलीसह त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आला होता, त्याच्या डोळ्यातील अश्रूंना त्यावेळी खळ नव्हता.

 

Follow Us