Mayuri Deshmukh : पतीनं स्वत:ला संपवल्यामुळे वयाच्या 28 व्या वर्षी उद्धवस्त झालेली मराठी अभिनेत्री, पुन्हा जिद्दीनं उभी राहिली, सांगितला कठीण काळ

मराठी अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीनं 2020 मध्ये स्वतःला संपवलं. त्यामुळे अभिनेत्रीला मोठा धक्का बसलेला. आता नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्रीनं यातून स्वतःला कसं सावरलं, याबद्दल सांगितलं आहे.

Mayuri Deshmukh : पतीनं स्वत:ला संपवल्यामुळे वयाच्या 28 व्या वर्षी उद्धवस्त झालेली मराठी अभिनेत्री, पुन्हा जिद्दीनं उभी राहिली, सांगितला कठीण काळ
| Updated on: Nov 14, 2026 | 6:33 PM

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मयुरी देशमुख हिनं आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. त्यानंतर हिंदी मालिकांमध्येही तिनं आपल्या अभिनयाची छाप पाडली. मात्र, मयुरीच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या एका दुःखद प्रसंगाने संपूर्ण मनोरंजनविश्वाला मोठा धक्का बसला होता. 2020 मध्ये मयुरीचा पती आणि अभिनेता आशुतोष भाकरे यानं आत्महत्या केली. त्यावेळी मयुरी अवघ्या 28 वर्षांची होती. या घटनेनंतर तिच्या आयुष्यात मोठं वादळ आलं. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्रीनं या कठीण काळाबद्दल भाष्य केलं असून त्यातून कशी सावरली, याबद्दल सांगितलं आहे.

 

Loading...

पतीचं निधन अन् पायाखालची जमीन सरकली

मयुरी देशमुख म्हणाली की, ‘भूतकाळाचा विचार न करता वर्तमानात जगायला शिका, हे वाक्य जितकं सोपं आहे, तितकंच ते पॉवरफुल आहे. कारण, तुम्ही कितीही खंबीर असाल, तुम्हाला कितीही पाठिंबा असुदे, किंवा तुमचे कितीही चांगले मित्र-मैत्रिणी असुदे, पण काही अशा घटना असतात ज्यामुळे तुमच्या पायाखालची जमीन सरकते. कधी-कधी काही घटना अशा असतात ज्याबद्दल काही कल्पनाच नसते. मग त्यातून बाहेर कसं पडायचं? असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे मी त्यातून हळूहळू सावरत होते. छोट्या-छोट्या गोष्टींमुळे मी सावरत गेले.’

‘वेळ गेल्यानंतर सगळं ठीक होतं, हे तुमच्या लक्षात येतं. त्यातून सावरणं सोपं नाहीये, हे माझ्या लक्षात आलेलं. मला वाईट वाटणार, मला दुःख होणार, हे सगळं मी स्वीकारलं. त्यामुळे त्याच गोष्टीमध्ये न अडकता, जे घडलंय ते स्वीकारलं आणि ठरवलं मला असं जगायचं नाहीये.’ असं मयुरी शेवटी म्हणाली. ‘लोकशाही‘ला दिलेल्या मुलाखतीत मयुरी देशमुख बोलत होती.

 

दरम्यान, मयुरी देशमुख आणि आशुतोष भाकरे यांचा 20 जानेवारी 2016 मध्ये लग्न झालेलं. मात्र, 29 जुलै 2020 रोजी नांदेड येथील राहत्या घरी आशुतोषनं आत्महत्या केली. तो त्यावेळी अवघ्या 32 वर्षांचा होता. त्याच्या निधनानं मयुरीसह संपूर्ण मराठी मनोरंजनविश्वाला मोठा धक्का बसला होता. पतीच्या निधनानंतर आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगाचा सामना करत मयुरीनं अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरू ठेवला. ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेनंतर तिनं हिंदी मालिकांमध्येही काम केलं. ‘इमली’ या मालिकेत तिनं मालिनीची भूमिका साकारली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us