Divya Shinde: आंबेडकरी चळवळीत असल्यानेच टार्गेट केलं, खंडणी प्रकरणात दिव्या शिंदेचा मोठा खुलासा, आरोप फेटाळले
'बिग बॉस मराठी 6'ची स्पर्धक आणि प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिव्या शिंदे हिच्यावर गेल्या महिन्यात काळे पडळ पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

Divya Shinde News: ‘बिग बॉस मराठी 6’ची स्पर्धक आणि प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिव्या शिंदे हिच्यावर गेल्या महिन्यात काळे पडळ पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. पुणे कॅन्टोन्मेंट येथील निवृत्त डॉक्टर गायकवाड यांनी दिव्या शिंदे आणि तिच्या साथीदारांनी घरात घुसून मारहाण, तोडफोड करत पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केला होता, या प्रकरणात आता मोठा ट्वीस्ट आला आहे.
दिव्या शिंदेने आरोप फेटाळले..
समोर आलेल्या माहितीनुसार, दिव्या शिंदेने पाच लाखांची खंडणी तसेच मारहाण प्रकरणात झालेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दिव्या शिंदेने पुण्यात आपल्या वकिलांसोबत पत्रकार परिषद घेत या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. उलट डॉक्टर गायकवाड यांनीच आपल्याला मारहाण केल्याचा आणि विनयभंगाची तक्रार देण्यापूर्वीच आपल्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केल्याचा दावा तिने केला आहे.
श्रीलंकेत असतानाही डॉक्टर गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून आपल्या मारहाण करण्यात आली होती व माझ्या जीवाला जीवाला धोका असल्याचे सांगत दिव्याने भारतीय मिशनकडे मदत मागितल्याचा दावा केला. तसेच, काळेपडळ पोलीस ठाण्याने आपले म्हणणे ऐकून न घेता मोबाईल फोन जप्त केला आणि आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवले, असा गंभीर आरोपही तिने केला.
दरम्यान, या प्रकरणात आपण जामीन घेतला असून आंबेडकरी चळवळीत कार्यरत असल्यामुळे आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप दिव्या शिंदे हिने केला आहे. आता या संपूर्ण प्रकरणाविरोधात न्यायालयात दाद मागून कायदेशीर लढा देणार असल्याचेही तिने स्पष्ट केले आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
बिगबॉस फेम दिव्या शिंदेवर पाच लाखांची खंडणी मागितल्याचा तसेच पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड (65) यांच्या घरात घुसून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता. बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या ‘कला आविष्कार महोत्सवा’ची प्रसिद्धी केल्याचे सांगून पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार तिच्याविरुद्ध करण्यात आली होती.
