पतीने टोकाचं पाऊल उचलताच अवघ्या 28 व्या वर्षी उद्ध्वस्त झालेलं मराठी अभिनेत्रीचं आयुष्य; म्हणाली ‘तो आजही माझ्यासोबत..’
'खुलता कळी खुलेना' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुख हिचं वैयक्तिक आयुष्य अनेक चढउतारांनी भरलेलं आहे. काही वर्षांपूर्वी तिच्या पतीने टोकाचं पाऊल उचललं होतं. एका मुलाखतीत ती याविषयी व्यक्त झाली होती.

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मयुरी देशमुख हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मयुरी हिंदी मालिकांमध्येही झळकली. मात्र, तिच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या एका दुःखद प्रसंगाने सर्वांनाच धक्का बसला होता. मयुरीचा पती आणि अभिनेता आशुतोष भाकरे याने 2020 मध्ये टोकाचं पाऊल उचलत स्वत:ला संपवलं होतं. या घटनेनंतर मयुरीच्या आयुष्यात मोठं वादळ आलं. मात्र, पतीच्या आठवणी आजही तिच्या मनात कायम आहेत. एका मुलाखतीत मयुरी याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत मयुरीला पतीच्या निधनानंतर आयुष्यात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी पुन्हा लग्न करण्याचा विचार आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर मयुरीने दिलेलं उत्तर अनेकांच्या मनाला भावणारं होतं. ती म्हणाली, “माझ्या आयुष्यात कोणतीही पोकळी निर्माण झालेली नाही. मी ज्यांच्यावर प्रेम केलं आहे, त्यांच्यावर आजही प्रेम करते. तो आजही माझ्यासोबत आहे. माझ्या आयुष्यात कोणतीही पोकळी निर्माण झालेली नाही. मी माझं संपूर्ण आयुष्य एकटीने जगू शकत नाही, असं कोणी ठरवलं? मी प्रत्येक दिवस एकेक करून जगतेय. आणि खरं सांगायचं तर, सध्या माझ्यासाठी तोच पुरेसा आहे.”
View this post on Instagram
मयुरीला लहान मुलांची खूप आवड आहे. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही ती भाचीसोबतचे अनेक फोटो शेअर करत असते. भविष्यात पुन्हा लग्न करून स्वतःचं कुटुंब सुरू करण्याचा विचार आहे का, असं विचारल्यावर तिने वेगळंच मत मांडलं होतं. मुलं हवी असतील तर लग्न करणं आवश्यक नाही. आज दत्तक घेण्यासारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, असं ती म्हणाली.
मयुरी देशमुख आणि आशुतोष भाकरे यांचं 20 जानेवारी 2016 रोजी लग्न झालं होतं. मात्र, 29 जुलै 2020 रोजी आशुतोषने नांदेड इथल्या राहत्या घरी स्वत:ला संपवलं होतं. तो अवघ्या 32 वर्षांचा होता. त्याच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला होता.
दरम्यान, मयुरीने ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून लोकप्रियता मिळवली. त्यानंतर हिंदीतील ‘इमली’ मालिकेत मालिनीची भूमिका साकारत तिने हिंदी प्रेक्षकांचीही मनं जिंकली. वैयक्तिक आयुष्यातील कठीण प्रसंगांना सामोरं जात तिने अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरू ठेवला.
