73 वर्षीय ज्येष्ठ अभिनेत्याला CINTAA कार्यालयात मारहाण? कॅन्सरशी झुंज देणाऱ्या दीपक काझीर यांच्याबाबत धक्कादायक आरोप
ज्येष्ठ अभिनेते दीपक काझीर केजरीवाल यांना CINTAA कार्यालयात मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. कॅन्सरशी झुंज देणाऱ्या अभिनेत्याला लाथा-बुक्क्यांनी मारल्याचा दावा डेझी क्लेमेंट्स यांनी केला आहे.

मनोरंजनविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिंदी चित्रपट आणि टेलिव्हिजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते दीपक काझीर केजरीवाल यांच्यासोबत मुंबईतील CINTAA (सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन) कार्यालयात मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, दीपक हे कॅन्सरचे रुग्ण असून त्यांच्यावर लाथा-बुक्क्यांनी हल्ला करण्यात आल्याचा दावा असोसिएशनच्या लाइफटाइम मेंबर डेझी क्लेमेंट्स यांनी केला आहे. 26 नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेमुळे मनोरंजनविश्वात खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे कलाकारांच्या सुरक्षेचा मुद्दाही चर्चेत आला आहे.
नेमकं काय घडलं CINTAA कार्यालयात?
मिळालेल्या माहितीनुसार, 26 नोव्हेंबर रोजी दीपक काझीर CINTAA च्या मुंबईतील कार्यालयात गेले होते. मात्र, त्यांना कार्यालयात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. यामागचं कारण विचारण्यासाठी त्यांनी दीपक पराशर यांच्याकडे विचारणा केली. त्यानंतर वाद वाढला आणि त्यांच्यासोबत मारहाणीची घटना घडल्याचं डेझी क्लेमेंट्स यांनी सांगितलं. डेझी यांनी ‘बॉलिवूड क्रॉनिकल’शी बोलताना या घटनेबाबत गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, अरमान ताहिल, बृजेश, राम आणि सपन भट्टाचार्य यांनी दीपक यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेत ते जखमी झाले असून त्यांची प्रकृतीही ठीक नसल्याचं त्यांनी सांगितलं.
पहा व्हिडीओ-
कॅन्सरचे रुग्ण असल्याने व्यक्त केली चिंता
या संपूर्ण घटनेबाबत बोलताना डेझी यांनी दीपक यांच्या प्रकृतीची चिंता व्यक्त केली. दीपक हे कॅन्सरचे रुग्ण आहेत. असं असताना CINTAA सारख्या कलाकारांच्या संघटनेच्या कार्यालयात अशा प्रकारची घटना घडणं भीतीदायक आहे. आज त्यांच्यासोबत असं घडलं, उद्या आमच्यासोबतही असं होऊ शकतं, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
CINTAA अध्यक्ष उपासना सिंह यांनीही केले आरोप
दरम्यान, या प्रकरणात CINTAA च्या अध्यक्ष उपासना सिंह यांनी वेगळी बाजू मांडली आहे. त्यांनी दीपक काझीर यांच्याविरोधात पोलिसांत FIR दाखल केल्याची माहिती दिली. दीपक वारंवार कार्यालयात येऊन महिलांशी आणि कार्यकारिणी सदस्यांशी गैरवर्तन करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 26 नोव्हेंबरच्या घटनेदरम्यान ज्येष्ठ अभिनेते दीपक पराशर यांची प्रकृती बिघडली आणि ते बेशुद्ध पडले, असाही दावा उपासना सिंह यांनी केला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागल्याचंही त्यांनी सांगितलं.
दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी दावे
या प्रकरणात दोन्ही बाजूंकडून वेगवेगळे आरोप करण्यात आले आहेत. दीपक काझीर यांनी मारहाणीची तक्रार केल्याचं वृत्त आहे, तर उपासना सिंह यांनी त्यांच्याविरोधात FIR दाखल केली आहे. त्यामुळे नेमकी घटना काय घडली, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.