
दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. भारतीय सिनेमात त्यांचं योगदान फार महत्त्वाचं आहे. मिथुन चक्रवर्ती यांचं फक्त प्रोफेशनल आयुष्यच नाही तर, खासगी आयुष्य देखील तुफान चर्चेत राहीलं. जेव्हा त्यांनी एका मुलीला दत्तक घेतलं. मिथुन दा यांनी हेलेना ल्यूकशी लग्न केलं आणि चार महिन्यांनी ते वेगळे झाले. त्यानंतर अभिनेत्याने योगिता बालीशी लग्न केलं. लग्नानंतर योगिता आणि मिथून चक्रवर्ती यांनी तीन मुलांचं जगात स्वागत केलं. त्यांची तिन्ही मुलं बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत आहेत. तर मिथून दा यांची लेक दिशानी हिने हॉलिवूडमध्ये पदार्पण देखील केलं आहे.
दिशानी चक्रवर्ती ही मिथुन चक्रवर्ती आणि योगिता बाली यांची दत्तक मुलगी आहे. दिशानीचा जन्म कोलकाता येथे झाला आणि जन्मानंतर तिच्या आई – वडिलांनी तिला कचराकुंडीजवळ सोडून दिले. रस्त्याने जाणाऱ्यांनी तिला पाहिलं आणि त्यापैकी एकाने तिला घरी नेलं. वर्तमानपत्रात तिच्याबद्दल वाचल्यानंतर, मिथून दा ताबडतोब कोलकात्याला धावले आणि मुलीला दत्तक घेतलं. अभिनेत्याच्या पत्नीनेही त्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला.
मिथुन आणि योगिता यांनी औपचारिकता पूर्ण केली आणि दिशानीला कायदेशीररित्या दत्तक घेतले. तिला घरी आणल्यानंतर, चक्रवर्ती कुटुंबाने तिचे नाव दिशानी ठेवलं. दिशानी आणि मिथून यांचं फार घट्ट नातं आहे. दिशानी हिने भारतात शिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी लॉस एंजेलिस येथे गेली.
दिशानी हिने न्यूयॉर्क फिल्म अकादमीमधून अभिनयात पदवी प्राप्त केली. 2017 मध्ये, दिशानी हिने ‘गिफ्ट’ या लघुपटातून हॉलिवूडमध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 2022 मध्ये ती शेवटची ‘द गेस्ट’ या आणखी एका लघुपटात दिसली होती, ज्यामध्ये तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला.
मिथून दा यांच्या लेकीच्या खाजगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, दिशानी माइल्स मँटझारिस नावाच्या एका मुलाला डेट करत आहे. दोघे सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसतात. दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील होत असतात.
रिपोर्टनुसार, मिथुन चक्रवर्ती आणि त्यांची पत्नी योगिता बाली चक्रवर्ती हे त्यांचा मुलगा नमाशी चक्रवर्तीच्या ‘टोस्टेड एक कडक लव्ह स्टोरी’ या मिनी सीरिजमध्ये दिसणार आहेत.