MOVIE REVIEW : व्हिज्युअल ट्रीट, ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’

'तान्हाजी' या सिनेमातही आपल्याला मराठ्यांची शौर्यगाथा भव्य अंदाजात बघायला मिळणार (Tanhaji: The Unsung Warrior movie review)  आहे.

  • कपिल देशपांडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 23:25 PM, 9 Jan 2020
MOVIE REVIEW : व्हिज्युअल ट्रीट, 'तान्हाजी द अनसंग वॉरिअर'

ऐतिहासिक सिनेमा म्हटलं म्हणजे बॉलिवूडमध्ये दोन नावं लगेच डोळ्य़ासमोर येतात. एक म्हणजे संजय लीला भन्साळी आणि दुसरं आशुतोष गोवारिकर. आता यादीत अजून एक नाव आवर्जून घ्यावं लागेल ते म्हणजे ओम राऊत. ‘लोकमान्य एक युगपुरुष’ या मराठी सिनेमानंतर ओम राऊतने थेट बॉलिवूडमध्ये झेप घेतली आणि त्याच्या दृष्टीकोनातून साकारला ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’. आशुतोष गोवारिकरांच्या ‘पानिपत’मध्ये मराठ्यांची शौर्यगाथा बघितल्यानंतर आता ओम राऊत दिग्दर्शित ‘तान्हाजी’ या सिनेमातही आपल्याला मराठ्यांची शौर्यगाथा भव्य अंदाजात बघायला मिळणार (Tanhaji: The Unsung Warrior movie review)  आहे.

इतिहासाचं हे महत्त्वपूर्ण पान ओमनं मोठ्या हुशारीनं उलगडलं आहे. विशेष म्हणजे ही मर्द मावळ्यांची ही शौर्यगाथा थ्रीडीमध्ये मोठ्या पडद्यावर बघणं रसिकांसाठी व्हिजुअली ट्रीट असणार आहे. तगडा रिसर्च आणि कठोर परिश्रम यामुळे ओम राऊतनं उभ्या केलेल्या या विश्वात तुम्ही हरवून जाल. छत्रपती शिवाजी महाराजांचा लहानपणीचा मित्र सुभेदार तानाजी मालुसरेंच्या जीवनावर आधारित हा सिनेमा बनवण्याचं शिवधनुष्य ओमने उचलल्याबद्दल त्याचं कौतुक. सुभेदार तानाजी मालुसरेंचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे, पण तरीही इतिहासाच्या पानात हे नाव कुठेतरी हरवलं. इतिहासाच्या पानात हरवलेल्या वीर योद्ध्याची ही पराक्रम गाथा दाखवण्याचा प्रयत्न ओमनं केला आहे. अर्थात ही गाथा आपण यापूर्वी शिवकालीन इतिहासामध्ये वाचली आहे. तरीही हे सगळं मोठ्या पडद्यावर बघणं लाजवाब.

औरंगजेब (ल्यूक केनी) ला संपूर्ण भारतावर वर्चस्व गाजवाचंय. दक्षिण भारतातलं छत्रपती शिवाजी महाराजां(शरद केळकर)चं वर्चस्व संपवण्यासाठी महाराज विरुध्द मुघल सरदार मिर्झा राजे जयसिंगला उभं करतो. 1665 साली छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल सरदार जयसिंगमध्ये पुरंदरचा तह झाला होता. या तहा स्वराज्यातील 23 किल्ले महाराजांना मुघलांच्या स्वाधीन करावे लागले होते, पण तरीही मुघलांची भूक मिटत नाही आणि ते कोंडाण्यावरही ताबा मिळवतात. या तहानंतर तीन वर्षांनी पुन्हा एकदा शिवाजी महाराज सर्व किल्ले स्वराज्यात आणण्याचा निश्चय (Tanhaji: The Unsung Warrior movie review)  करतात.

दुसरीकडे औरंगजेब आपला विश्वासू उदयभान राठोड (सैफअली खान)ला नागिन नामक मोठी तोफ घेऊन कोंडाणाचा किल्लेदार म्हणून पाठवतो. या सगळ्या गदारोळापासून दूर तान्हाजी (अजय देवगण) ला या सगळ्याचा थांगपत्ताही नसतो. ते आपल्या मुलाच्या लगीन घाईत व्यस्त असतात. पण जेव्हा तान्हाजीला या योजनेची माहिती मिळते. तेव्हा ‘आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं’ अशी प्रतिज्ञाच ते करतात आणि मग 4 फेब्रुवारी 1670 रोजी मर्द मावळे कोंडाण्यावर भगवा कसा फडकवतात याची शौर्यगाथा म्हणजेच सिनेमा.

दिग्दर्शक ओम राऊतनं या सिनेमात व्हीएफक्सचा उत्तम वापर केला आहे. व्हिएफक्सचा उत्तम वापर, थ्रीडी तंत्रज्ञान त्याला कलाकारांचा अभिनय आणि उत्कंठावर्धक अॅक्शन सीन्सची जोड… त्यामुळे हा सिनेमा शेवटपर्यंत आपली ग्रीप सोडत नाही. थ्रीडीमध्ये युध्दाचे प्रसंग बघणं रसिकांसाठी ट्रीट आहे. जर्मनीचा अॅक्शन दिग्दर्शक रमाजानने सिनेमातील युध्दाचे सीन्स डिझाईन केले आहेत. सिनेमातील अनेक प्रसंग श्वास रोखायला भाग पाडतात. दिग्दर्शक म्हणून ओम राऊतचा हा पहिलाच बॉलिवूड सिनेमा अजिबात वाटत नाही. प्रत्येक फ्रेमवर, छोट्या छोट्या गोष्टींवर त्याने बारकाईने अभ्यास केला आहे. कपड्यांपासून, सेट, कलाकारांची भाषा सगळ्याच गोष्टींवर मेहनत घेतली आहे. या सगळ्यासाठी ओमला 100 पैकी 100 गुण. सिनेमातील शेवटचं कोंडाण्यावरचं युध्द सिनेमातला हायपाईंट आहे. हा एक भव्य आणि मनोरंजक सिनेमा आहे.

सुभेदार तान्हाजी मालुसरेंच्या भूमिकेत अजय देवगणने कमाल केली आहे. इमोशनल सीन्स असो वा युध्दाचे सीन्स या सगळ्यांमध्ये अजयने बाजी मारली आहे. सावित्रीबाई मालुसरेंच्या छोट्या भूमिकेत काजोलनं छाप सोडली आहे. अजयसोबत तिची केमिस्ट्री उत्तम जमली आहे. सिनेमात सरप्राईज पॅकेज ठरला आहे सैफ अली खान. क्रूर उदयभान राठोडच्या भूमिकेत सैफनं कहर केला आहे. लंगडा त्यागीनंतर सैफच्या करिअरमधली ही सर्वोत्तम भूमिका म्हणावी लागेल. बऱ्याच प्रसंगात तर तो अजयवरही भारी पडला आहे. त्याचं चालणं, वागणं, बोलणं, बघणं सगळचं लाजवाब. युध्दाच्या दृश्यातही तो भाव खाऊन (Tanhaji: The Unsung Warrior movie review)  गेला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शरद केळकर, सूर्याजी मालुसरेंच्या भूमिकेत देवदत्त नागे, शेलार मामांच्या भूमिकेत शशांक शेंडे, जिजामातांच्या भूमिकेत पद्मावती राव, कमला देवीच्या भूमिकेत नेहा शर्मा, पिसाळांच्या भूमिकेत अजिंक्य देव, औरंगजेबच्या भूमिकेत ल्यूक केनी सगळ्यांनीच जबरदस्त कामं केली आहेत. सिनेमाची सिनेमॅटोग्राफीही अप्रतिम आहे. सिनेमातील सेट्स डोळ्याचे पारणे फेडतात.

सिनेमाचं सचेत-परंपरा, अजय-अतुलनं दिलेलं संगीत उत्तम आहे. ‘माय भवानी’ आणि ‘शंकरा ही’ गाणी थिरकायला भाग पाडतात. एकूणच काय तर इतिहासाच्या पानात हरवलेल्या या मर्द मावळ्यांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर थ्रीडीमध्ये बघणं पर्वणी आहे. ही पर्वणी चुकवू नये असं माझं स्पष्ट मत आहे. हा सिनेमा तुम्हाला निराश करणार नाही.

‘टीव्ही 9 मराठी’कडून या सिनेमाला चार स्टार्स