दिसण्यावरून बिपाशाची खिल्ली उडवल्याप्रकरणी मराठी अभिनेत्रीने मागितली जाहीर माफी

बिपाशा बासू पुरुषी दिसते, अशा शब्दांत खिल्ली उडवणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीने जाहीररित्या माफी मागितली आहे. माझ्यासोबत असं घडलं नसतं तर कदाचित मला याची जाणीव झाली नसती, असंही ती म्हणाली.

दिसण्यावरून बिपाशाची खिल्ली उडवल्याप्रकरणी मराठी अभिनेत्रीने मागितली जाहीर माफी
Bipasha Basu
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 12, 2026 | 9:01 AM

सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल आणि त्यावर नेटकरी कशा प्रतिक्रिया देतील, याचा काही नेम नाही. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मृणाल ठाकूरचा एक जुना व्हिडीओ अचानक सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये ती अभिनेत्री बिपाशा बासूच्या दिसण्यावरून आणि फिगरवरून टिप्पणी करताना दिसली. बिपाशाबद्दल मृणालने वापरलेली भाषा नेटकऱ्यांना अजिबात आवडली नाही आणि त्यावरून अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. या ट्रोलिंगवर आता मृणालने प्रतिक्रिया दिली आहे. बिपाशाला तसं बोलणं चुकीचं होतं आणि त्या अनुभवातून बरंच शिकायला मिळालं, अशी प्रामाणिक कबुली तिने दिली. मला माझ्या शब्दांचं गांभीर्य समजलं आणि चुका स्वीकारल्यानेच प्रगती होते, असं ती म्हणाली.

‘फिल्मीज्ञान’ला दिलेल्या मुलाखतीत मृणाल म्हणाली, “ब्युटी स्टँडर्ड्सबद्दल मी काही म्हणाली होती. तशा परिस्थितीचा सामना मी स्वत: करेपर्यंत मला त्या गोष्टीची जाणीव झाली नाही. जर माझ्यासोबत असं घडलं नसतं तर कदाचित मला समजलंही नसतं. मला असंच वाटलं असतं की मी बरोबर आहे. पण नाही. मी खूप धाडस केलं आणि विनम्रपणे माझी चूक स्वीकारली. हा एक प्रवास आहे, ज्यातून प्रत्येकजण शिकत जातो.”

मृणाल नेमकं काय म्हणाली होती?

व्हायरल व्हिडीओमध्ये मृणालसोबत एक व्यक्ती बसलेली आहे आणि ती व्यक्ती बिपाशाचं कौतुक करत असते. त्यावर मृणाल त्याला म्हणते, “मी बिपाशापेक्षा चांगली आहे. तुला अशा मुलीशी लग्न करायचंय का, जी पुरुषी दिसते आणि जिचे मसल्स असतील? जा तू बिपाशा बासूशी लग्न कर. मी तिच्यापेक्षा कितीतरी पटींनी चांगली आहे.”

ट्रोलिंगनंतर मृणालने सोशल मीडियावर पोस्ट लिहित जाहीर माफीसुद्धा मागितली होती. “19 व्या वर्षांची मी किशोरवयीन असताना अनेक मूर्खपणाच्या गोष्टी म्हटल्या होत्या. माझ्या आवाजाचं वजन किती असेल किंवा सहज, मस्करीत म्हटलेले शब्दही कोणाला किती दुखावू शकतात, हे मला समजत नव्हतं. त्यामुळे मी मनापासून माफी मागते. माझा उद्देश कोणालाही बॉडीशेम (दिसण्यावरून टीका करण्याचा) करण्याचा नव्हता. मुलाखतीत केलेली ती एक मस्करी होती, जी खूप महागात पडली आहे.”