Nana Patekar: सख्ख्या भावानेही केलं नसेल एवढं नानाने..; बायकोला कॅन्सर झाल्यानंतर केलेल्या मदतीविषयी बोलताना शिवाजी साटम भावूक

Nana Patekar: नानांनी आपल्या आयुष्यात केवळ अभिनयाची छाप सोडली नाही, तर मैत्री निभावतानाही माणुसकी जपली. शिवाजी साटम यांनी सांगितलेला हा किस्सा नाना पाटेकर यांच्या संवेदनशील आणि मदतीला धावून जाणाऱ्या स्वभावाची आठवण करून देतो.

Nana Patekar: सख्ख्या भावानेही केलं नसेल एवढं नानाने..; बायकोला कॅन्सर झाल्यानंतर केलेल्या मदतीविषयी बोलताना शिवाजी साटम भावूक
Shivaji Satam and Nana Patekar
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 15, 2026 | 1:31 PM

Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत अभिनेते शिवाजी साटम यांनी नानांसोबतच्या अनेक आठवणी सांगितल्या. यावेळी त्यांनी पत्नीला कॅन्सर झाल्यानंतर नाना पाटेकर यांनी केलेल्या मदतीचा हृदयस्पर्शी किस्सा सांगितला. नानांनी त्या कठीण काळात ज्या पद्धतीने आपल्याला आधार दिला, ते आठवताना शिवाजी साटम भावूक झाले. ‘सख्ख्या भावानेही केलं नसेल एवढं नानाने केलं,’ अशा शब्दांत त्यांनी नानांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

पत्नीला कॅन्सर झाल्यानंतर नानांनी दिला आधार

शिवाजी साटम म्हणाले की, नाना पाटेकर यांच्यावर मी जिवापाड प्रेम करतो, त्यामागे अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचं कारण म्हणजे पत्नीच्या आजारपणात त्यांनी केलेली मदत. त्या काळात शिवाजी साटम यांच्या पत्नीला कॅन्सर झाला होता. त्याच वेळी त्यांच्या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. पत्नीच्या उपचारांमुळे त्यांच्यासाठी शूटिंग करणं कठीण झालं होतं. अशा परिस्थितीत त्यांनी नाना पाटेकर यांना आपली अडचण सांगितली. पत्नीच्या आजारपणामुळे आपण हा चित्रपट पुढे करू शकणार नाही, असं त्यांनी नानांना सांगितलं. मात्र, नानांनी त्यांना धीर देत, ‘तू गप्प बस, एक दिवस थांब,’ असं सांगितलं.

Loading...

नानांनी स्वतः पुढाकार घेऊन केली व्यवस्था

पत्नीच्या उपचारांसाठी आपल्याला दररोज सकाळी आणि रात्री रुग्णालयात जावं लागणार असल्याचं शिवाजी साटम यांनी नानांना सांगितलं होतं. त्यानंतर नानांनी चित्रपटाशी संबंधित लोकांशी चर्चा केली आणि त्यांच्या वेळेनुसार शूटिंगची व्यवस्था करून घेतली. शिवाजी साटम यांनी सांगितलं की, दिग्दर्शकांनी त्यांना दुपारी 12 वाजता सेटवर येण्यास आणि रात्री 8 वाजता घरी जाण्यास सांगितलं. विशेष म्हणजे, ही सगळी व्यवस्था नानांनी स्वतः पुढाकार घेऊन केली होती. त्यांच्या मदतीमुळे शिवाजी साटम यांना पत्नीच्या उपचारांसाठी वेळ देता आला आणि चित्रपटाचं कामही सुरू राहिलं. ‘हे फक्त नानाच करू शकतो. सख्ख्या भावासारखं त्याने हे केलं,’ असं सांगताना शिवाजी साटम यांनी नानांच्या संवेदनशील स्वभावाची आठवण करून दिली.

सेटवर भांडणं, क्रिकेट आणि नानांच्या गंमतीशीर आठवणी

शिवाजी साटम यांनी नानांसोबतच्या इतर आठवणीही सांगितल्या. दोघांमध्ये अनेकदा भांडणं व्हायची, शिवीगाळही व्हायची; मात्र त्यांच्यातील मैत्री तितकीच घट्ट होती. सेटवर क्रिकेट खेळताना नाना बाद होत नसल्यामुळे रडायचे, अशी गंमतीशीर आठवणही त्यांनी सांगितली. नाना अचानक फोन करून शेतावर बोलवायचे. नाना आणखी 15 ते 20 वर्षे सहज जगू शकले असते भेटल्यावर घट्ट मिठी मारायचे आणि आपले बायसेप दाखवायचे, असंही शिवाजी साटम यांनी सांगितलं. नानांसोबतच्या आठवणी इतक्या आहेत की, त्यावर तासनतास बोलता येईल, असं ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us