
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना ‘मी टू’ प्रकरणी अखेर दिलासा मिळाल्याची चर्चा आहे. लैंगिक छळाचा आरोप झाल्याप्रकरणी नाना पाटेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाना पाटेकर यांच्याविरोधातील B समरी रिपोर्ट दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळून लावला आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. मात्र हे आरोप सिद्ध करणारे पुरावे उपलब्ध नसल्याने दंडाधिकारी कार्यालयाने बी समरी रिपोर्ट फेटाळून लावला आहे. त्यामुळे नाना पाटेकर यांना मोठा दिलासा मिळाल्याचं सांगितलं जातं. मात्र, तनुश्री दत्ताचे वकील नितीन सातपुते यांनी मात्र तनुश्रीची याचिका कोर्टाने रद्द केली नसल्याचा दावा केला आहे. बी समरी रिपोर्ट नाकारला असला तरी तनुश्रीची तक्रार कोर्टाने नाकारली नसल्याचं वकील नितीन सातपुते यांनी म्हटलं आहे.
तनुश्री दत्ताने नाना पाटेकर आणि इतरांविरोधात अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात विनयभंग तसेच धमकीची तक्रार दाखल केली होती. यावर दंडाधिकाऱ्यासमोर सुनावणी झाली. मुंबई पोलिसांनी सादर केलेला क्लोजर रिपोर्ट तसेच पुरेशा पुराव्यांअभावी तनुश्रीने दाखल केलेली तक्रार न्यायालयाने अखेर नाकारल्याचं वृत्त आहे.
अभिनेत्री तनुश्री दत्तानं 2008 मध्ये नाना पाटेकर, कोरिओग्राफर गणेश आचार्य, दिग्दर्शक अब्दुल सामी सिद्दीकी आणि निर्माता राकेश सारंग यांच्याविरोधात एका डान्स सिक्वेन्स दरम्यान लैंगिक छळाचा आरोप केला होता. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात या चौघांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता.
तनुश्री दत्ताने 2018 मध्ये MeToo मोहिमेअंतर्गत दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. 2008 मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ सिनेमाची शुटिंग सुरु असताना नाना पाटेकर यांनी लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा तनुश्रीने केला होता. इतकंच नव्हे तर सिंगर एक्टर शूट होणार होतं, तरी देखील नाना पाटेकर सेटवर आले होते, असे देखील तनुश्री दत्ताने म्हटलं होतं. नाना पाटेकर यांच्या विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. मात्र सबळ पुरावे आणि साक्षीदार नसल्याने पोलिसांनी वर्षभरातच केस बंद केली होती.
“मला माहिती होतं की, हे आरोप खोटे आहेत. त्यामुळं राग यायचा प्रश्नच नव्हता. खोट्या गोष्टींचा, आरोपांचा राग का यावा? आता तर या गोष्टी खूपच जुन्या झाल्यात. ज्या गोष्टी झाल्यात त्यावर आत्ता काय बोलणार. खरं काय आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे. जे घडलंच नव्हतं, त्याबद्दल मी त्यावेळी काय बोलणार होतो? अचानक कुणीतरी येतं आणि म्हणतं तुम्ही हे असं केलं, आरोप करतं… त्यावेळी मी काय उत्तर द्यायला पाहिजे होतं? मी हे केलंच नाहीये…हे सांगणं अपेक्षित होतं का?” असे नाना पाटेकर यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटलं होतं.
मिळालेल्या माहितीच्या आधारावर, ओशिवारा पोलिस ठाण्याद्वारे ‘B’ समरी रिपोर्ट (तक्रारदाराला आरोप करण्यासाठी) मंजुरीसाठी दाखल केलेला मिसलेनियस अर्ज क्र. 427/2019 न्यायाधीशांनी नाकारला आहे. तपास अधिकाऱ्याने जो B समरी रिपोर्ट दाखल केला आहे, तो स्वीकारता येत नाही. त्यावर कारवाई करण्यास अडथळा येत आहे, असं कोर्टाने म्हटलं आहे. तसेच न्यायालयाने केवळ तक्रारीच्या पोलिसांच्या दाखल करण्याच्या मर्यादांवर विचार केला आहे, ताज्या तपासाच्या परिणामावर नाही. न्यायालयाने तनुश्री दत्ताची तक्रार खरी किंवा खोटी आहे हे ठरवलेले नाही. पोलिसांनी दाखल केलेला ‘B समरी रिपोर्ट’ नाकारल्यानंतर, पोलिसांसमोर दोन पर्याय उरले आहेत – आरोपपत्र दाखल करणे किंवा सेशन न्यायालयात पुनरावलोकनासाठी आदेशाला आव्हान करणे, अशी माहिती तनुश्री दत्ता हिचे वकील नितीन सातपुते यांनी दिली आहे.
न्यायालयाने ओशिवारा पोलिस ठाण्याचा मिसलेनियस अर्ज 427/2019 नाकारला आहे. पण काही न्यूज पोर्टल्स चुकीची माहिती पसरवत आहेत की तनुश्री दत्ताचा तक्रार/अर्ज नाकारला आहे. या सर्व सुनावणीमध्ये आरोपींचे प्रतिनिधित्व कोणीही केलेले नाही. न्यायालयाने केसच्या तपशीलावर चर्चा केली नाही. न्यायालयाचे मुख्य निरीक्षण हे होते की, गुन्ह्याची प्रकरणाची मुदत कालावधी संपली आहे. आता पोलिसांनी न्यायालयाला संतुष्ट करणे आवश्यक आहे. कारण त्यांचा ‘B समरी रिपोर्ट’ नाकारला आहे, पण तनुश्री दत्ताची तक्रार नाकारलेली नाही, असं नितीन सातपुते यांनी म्हटलं आहे.