Nana Patekar: माझ्याकडे रूप नाही, रंग नाही, खानदान नाही.. इथं कसा टिकेन? नाना पाटेकरांनी सोनाली कुलकर्णीला सांगितलं होतं रागीट स्वभावामागचं कारण

Nana Patekar: नाना पाटेकर हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे अनेकदा ते चर्चेत राहिले. मात्र, त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला आलेले नकार, अपमान आणि असुरक्षिततेची भावना यांचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम झाला होता.

Nana Patekar: माझ्याकडे रूप नाही, रंग नाही, खानदान नाही.. इथं कसा टिकेन? नाना पाटेकरांनी सोनाली कुलकर्णीला सांगितलं होतं रागीट स्वभावामागचं कारण
नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 12, 2026 | 9:39 AM

Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर म्हटलं की, डोळ्यांतून व्यक्त होणाऱ्या भावना, दमदार संवादफेक आणि स्पष्टवक्तेपणा डोळ्यांसमोर येतो. त्यांच्या अभिनयाइतकाच त्यांच्या तिरसट आणि रागीट स्वभावाचीही अनेकदा चर्चा झाली. मात्र, एखाद्या व्यक्तीच्या स्वभावावर टीका करणं सोपं असलं, तरी त्यामागची कारणं समजून घेणं तितकंच महत्त्वाचं असतं. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने लोकसत्तामध्ये लिहिलेल्या लेखातून नाना पाटेकर यांच्या स्वभावामागची एक वेगळी बाजू समोर आणली आहे. स्वतः सोनालीने नानांना त्यांच्या रागीट स्वभावाबद्दल विचारलं होतं. त्यावेळी त्यांनी दिलेलं उत्तर त्यांच्या संघर्षाची आणि मनातील वेदनेची जाणीव करून देणारं आहे.

‘..मग मी इथं कसा टिकेन?’

सोनाली कुलकर्णीने नाना पाटेकर यांना त्यांच्या तिरसट स्वभावाबद्दल थेट प्रश्न विचारला होता. ‘तुम्ही असे का वागायचात? वेगवेगळ्या सुपरस्टार्सचा अपमान कशाला केलात?’ असा सवाल तिने केला. त्यावर नानांनी कोणतीही आडपडदा न ठेवता आपल्या आयुष्यातील संघर्ष सांगितला. ‘एका अत्यंत सामान्य कुटुंबातून मी आलो. माझ्याकडे रूप नाही, रंग नाही, नाव नाही, खानदान नाही, पैसा नाही, शिक्षण नाही. मग मी इथं कसा टिकेन?’ असं उत्तर नानांनी दिलं होतं.

Loading...

नाना पाटेकर यांनी या संवादादरम्यान त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीचा एक कटू अनुभवही सांगितला. पहिला चित्रपट मिळाल्यानंतर काही दिवस त्यांनी त्याचा आनंद साजरा केला. मात्र, शूटिंगसाठी पोहोचल्यानंतर त्यांना एक वेगळाच अनुभव आला. आपण त्या चित्रपटातच नसल्याचं त्यांना तिथे समजलं. विशेष म्हणजे, याबद्दल त्यांना आधी कळवण्याची तसदीही कुणी घेतली नव्हती. हा अनुभव त्यांच्यासाठी अपमानास्पद होता. आपल्याला लाजल्यासारखं वाटलं, मनात प्रचंड वेदना झाल्या; पण त्या वेळी आपला राग व्यक्त करायचा तरी कुणावर, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. या अनुभवाने त्यांच्या मनावर खोल परिणाम केला.

‘मी कणखर राहिलो नसतो, तर कुणी विचारलंही नसतं’

या कटू अनुभवानंतर नानांनी लोकांशी बोलण्याची आपली पद्धत बदलली. त्यांनी सगळ्यांशी अरे-तुरे करून बोलायला सुरुवात केली. त्यांच्या मते, चित्रपटसृष्टीत टिकून राहण्यासाठी त्यांना कठोर आणि कणखर बनणं आवश्यक होतं. ‘मी तेवढा घट्ट आणि कणखर राहिलो नसतो, तर मला कुणी वाऱ्यालासुद्धा उभं केलं नसतं,’ असं ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us