‘कोकेन, एमडीएमए हे ड्रग्स मी स्वत: घेतलेत, माझ्यासमोरच मी दुसऱ्या सेलिब्रिटींना..’, मराठी अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा
प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री नारायणी शास्त्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत टीव्ही इंडस्ट्रीतील काळं सत्य पुन्हा उघड केलं आहे. इंडस्ट्रीतील पार्ट्यांमध्ये कशा पद्धतीने ड्रग्जचं सेवन केलं जातं, याविषयीचा खुलासा तिने केला आहे.

‘क्योंकी सास भी कभी बहू थी’, ‘पिया का घर’, ‘कुसुम’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री नारायणी शास्त्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे. टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक कलाकार ड्रग्जचं सेवन करतात, असा दावा तिने केला आहे. मात्र यावेळी तिने ठराविक कलाकाराचं नाव घेतलं नाही. परंतु सर्वसामान्यपणे मनोरंजनसृष्टीत काम करणारे बहुतांश लोक ड्रग्ज घेतात आणि त्यांच्यासाठी ही खूप सामान्य गोष्टी आहे, असं नारायणी म्हणाली. पार्ट्यांमध्ये अनेक सेलिब्रिटींना ड्रग्ज घेताना मी स्वत: डोळ्यांनी पाहिल्याचाही दावा तिने या मुलाखतीत केला आहे. इतकंच नव्हे तर तिनेही ड्रग्जचं सेवन केल्याची कबुली दिली आहे.
ड्रग्जसाठी बजेट
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत नारायणी म्हणाली, “मनोरंजन विश्वात पार्ट्यांमधील दारूसाठी एक विशिष्ट बजेट ठरवली जाते. पण त्याचसोबत आता तिथे बेकायदेशीर ड्रग्जचंही बजेट असतं. पूर्वी पार्ट्यांमध्ये दारूसाठी बजेट असायचं. आता ड्रग्जसाठी बजेट असतं. हे पाहून मला धक्काच बसला. म्हणूनच मी अनेक वर्षांपूर्वीच पार्ट्यांना जाणं बंद केलं. कारण आता पार्ट्यांमध्ये डान्स किंवा मजामस्ती नसते. तिथे काहीतरी वेगळंच घडत असतं. पण मोठ्या पार्ट्यांमध्ये अशा गोष्टी इतक्या उघडपणे घडत नाहीत. मी ड्रग्ज घेणाऱ्यांना वैयक्तिकरित्या ओळखत नाही. पण मी लोकांना ते करताना पाहिलं आहे.”
स्वत:सुद्धा केलं ड्रग्जचं सेवन
या मुलाखतीत नारायणीला विचारण्यात आलं की, या पार्ट्यांमध्ये कोणत्या प्रकारची ड्रग्ज वापरली जातात? त्यावर तिने सांगितलं, “कोकेन, एमडीएमए. मी आयुष्यात सर्वकाही करून पाहिलंय. पण फक्त त्याचा परिणाम काय होतो, ते कसं काम करतं हे जाणून घेण्यासाठीच. मी स्वत:ला कधीच कशाचंही व्यसन लावलं नाही. मी प्रत्येक ड्रग्ज फक्त एकदाच सेवन करून पाहिलं होतं. मी एकदा दारुसुद्धा प्यायली होती. जर कोणी माझ्या पेयात काही मिसळलं तर त्याचे परिणाम काय होतात, हे मला जाणून घ्यायचं होतं.”
सेटवरही ड्रग्ज
कलाकार सेटवरसुद्धा ड्रग्जचं सेवन करतात का, असाही प्रश्न नारायणीला पुढे विचारण्यात आला. तेव्हा तिने होकारार्थी उत्तर दिलं. इतकंच नव्हे तर हे वारंवार घडत असल्याचंही स्पष्ट केलं. “आम्हाला त्यामुळे शूटिंग रद्द करावे लागायचे. कारण कलाकार शूटिंगच्या स्थितीतच नसायचे. हे सर्व काय चाललंय असा विचार करत आम्ही चार तास वाट बघत बसायचो. ड्रग्ज घेतल्यानंतर ते नीट उभंही राहू शकत नसत. हे बऱ्याचदा घडायचं”, असा खुलासा नारायणीने केला आहे.