Bigg Boss OTT 2 | बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच नवाजुद्दीनच्या पत्नीचा सलमानवर आरोप; म्हणाली..

नवाजुद्दीन सिद्दिकीची पत्नी या ओळखीशिवाय आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी ती बिग बॉसच्या घरात आली होती. बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी आलिया आणि नवाजुद्दीन यांच्यातील वाद सोशल मीडियावर तुफान चर्चेत होता.

Bigg Boss OTT 2 | बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच नवाजुद्दीनच्या पत्नीचा सलमानवर आरोप; म्हणाली..
Aaliya Siddiqui and Salman Khan
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 29, 2023 | 3:40 PM

मुंबई : बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. या सिझनमध्ये गेल्या काही दिवसांपासून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीची पत्नी आलिया सिद्दिकी सर्वाधिक चर्चेत होती. मात्र नुकतंच तिला बिग बॉसच्या घराबाहेर पडावं लागलं. घराबाहेर पडल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत आलियाने सूत्रसंचालक सलमान खानवर राग व्यक्त केला आहे. सलमानवर तिने पक्षपातीचा आरोप केला आहे. या शोमध्ये सलमान त्याच्या जवळच्याच व्यक्तींना पाठिंबा देणार, असाही दावा तिने केला.

बिग बॉस ओटीटी 2 च्या घरात आलिया आठवी स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. या शोमध्ये केवळ आपली छवी बदलण्यासाठी आल्याचं तिने स्पष्ट केलं होतं. नवाजुद्दीन सिद्दिकीची पत्नी या ओळखीशिवाय आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी ती बिग बॉसच्या घरात आली होती. बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी आलिया आणि नवाजुद्दीन यांच्यातील वाद सोशल मीडियावर तुफान चर्चेत होता.

डीएनएला दिलेल्या मुलाखतीत आलिया म्हणाली, “मी बिग बॉसच्या घरात स्वत:बद्दल बोलले पण त्या गोष्टीवरून टारगेट करणं मला समजलं नाही. प्रत्येकजण त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बोलत होतं. मग मलाच का टारगेट केलं गेलं?” सलमान खानने पक्षपात केला का असा सवाल विचारला असता ती पुढे म्हणाली, “शंभर टक्के. सलमान त्याच लोकांची साथ देणार जे त्याच्या आसपास आहेत. दुसऱ्या स्टारला तो पाठिंबा देणार नाही.”

“आता पुढच्या वीकेंडला मला हेच बघायचं आहे की पूजा भट्टच्या वक्तव्यावर सलमानची काय प्रतिक्रिया असेल? मी महेश भट्टची मुलगी आहे, असं ती नुकत्याच एपिसोडमध्ये म्हणाली होती. बाहेरचं जग कसं आहे याविषयी मीसुद्धा बोलले होते. त्यामुळे हा खेळ किती निष्पक्ष आहे ते मला पहायचं आहे. मला वाटत नाही की हे लोकांचं बिग बॉस आहे. इंडस्ट्रीत फेव्हरिझ्म आहे हे स्पष्ट जाणवतं”, असा आरोप तिने केला.

बिग बॉसच्या घरात अभिनेत्री पूजा भट्ट आणि आलिया सिद्दिकी यांच्यात जोरदार वाद झाल्याचं पहायला मिळालं होतं. घरातील एका टास्कदरम्यान पूजा आलियाला म्हणते, “तू विक्टिम कार्ड (स्वत: पीडित असल्याचं दाखवून सहानुभूती मिळवणं) खेळणं बंद कर.” बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी आणि केल्यानंतरही अनेकदा आलियाने नवाजुद्दीनसोबतच्या घटस्फोटाचा उल्लेख केला होता. मात्र केवळ घटस्फोटाच्या आधारावर प्रेक्षकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नकोस, असं पूजाने तिला खडसावलं होतं.