प्रेमामुळे नाही तर..; नीना गुप्ता यांनी सांगितलं लग्न करण्यामागचं प्रामाणिक कारण

अभिनेत्री नीना गुप्ता यांनी विवेक मेहरा यांच्याशी लग्न करण्यामागचं अत्यंत प्रामाणिक कारण सांगितलं आहे. नीना आणि विवियन रिचर्ड्स यांचं नातं जगजाहीर होतं. या नात्यातून त्यांना मसाबा ही मुलगी आहे. त्यानंतर नीना गुप्ता यांनी विवेक मेहरा यांच्याशी लग्न केलं.

प्रेमामुळे नाही तर..; नीना गुप्ता यांनी सांगितलं लग्न करण्यामागचं प्रामाणिक कारण
Neena Gupta and Vivek Mehra
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 18, 2026 | 1:24 PM

ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांचं खासगी आयुष्य हे जणू खुल्या किताबाप्रमाणेच आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट टीमचे माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांच्याशी ते रिलेशनशिपमध्ये होते. त्यातून त्यांना एक अपत्यसुद्धा आहे. परंतु विवियन रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांनी लग्न केलं नाही. कारण त्यावेळी विवियन हे आधीच विवाहित होते आणि ते त्यांच्या पत्नी, कुटुंबाला सोडू इच्छित नव्हते. तर बाळाला जन्म द्यायचा की नाही, याचा निर्णय त्यांनी नीना यांच्यावर सोपवला होता. नीना यांनी त्या कठीण परिस्थितीतही बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला होता आणि लेक मसाबाचं त्यांनी एकटीने संगोपन केलं. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी विवेक मेहरा यांच्याशी लग्न केलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्या विवेक मेहरा यांच्याशी लग्न करण्यामागचं कारण सांगितलं. चार्टर्ड अकाऊंटंट विवेक यांच्याशी प्रेमामुळे नाही तर परिस्थितीमुळे लग्न केल्याचं त्यांनी मान्य केलं.

शुभांकर मिश्राला दिलेल्या या मुलाखतीत नीना यांना विचारलं गेलं की, “तुम्ही प्रेमामुळे एकमेकांशी लग्न केलं का?” त्यावर स्मितहास्य करत नीना म्हणाल्या, “हा खूप कठीण प्रश्न आहे. मला प्रेम समजत नाही. मला फक्त माझ्या मुलीवर असलेलं प्रेम समजतं. त्याशिवाय मला बाकी काहीच समजत नाही.” हे ऐकल्यानंतर शुभांकरने त्यांना विवेक मेहरा यांच्याशी लग्न करण्यामागचं कारण विचारलं. त्यावर त्यांनी अत्यंत प्रामाणिक उत्तर दिलं.

“गरज होती, खूप. जर आपल्याला समाजात राहायचं असेल तर समाजाच्या काही नियमांचं पालन करावं लागतं. ही गोष्ट मी माझ्या चुकांमधून शिकले. एकतर तुम्ही आयलँडवर राहा किंवा मग तुम्ही तुमच्या मर्जीने जगा. इथे मी जसा विचार करते, तसाच बाकीचे करत नाहीत. मी कुठेही गेले तरी माझ्याकडे विचित्र नजरेनं पाहिलं जातं. त्यामुळे मला कम्फर्टेबल वाटत नव्हतं. लग्न करा.. सर्वकाही ठीक होईल. ही खूप दु:खद बाब आहे, पण हेच सत्य आहे”, अशा शब्दांत नीना गुप्ता व्यक्त झाल्या.

नीना यांनी पुढे असंही स्पष्ट केलं की, जरी लग्न हे महत्त्वाचं असल्याचं त्या मानत असल्या तरी त्याचा अर्थ कोणाशीही लग्न करावं असा होत नाही. परंतु आपल्या समाजात एखाद्या महिलेनं एकटं राहणं खूप कठीण असल्याचं त्या म्हणाल्या.