
वयाच्या 66 व्या वर्षीही अभिनेत्री नीना गुप्ता त्यांच्या दमदार अभिनयकौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. एकेकाळी त्यांना सोशल मीडियावरील पोस्टद्वारे कामाची मागणी करावी लागली होती. आता त्याच नीना गुप्ता यांच्याकडे चौकटीबाहेरच्या भूमिकांच्या ऑफर्सची रांग लागली आहे. आतापर्यंत त्यांनी असंख्य चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. बऱ्याच वर्षांच्या विश्रांतीनंतर त्यांनी आयुषमान खुरानाच्या ‘बधाई दो’ या चित्रपटातून पुनरागमन केलं होतं. त्यानंतर त्यांनी ओटीटीवरही आपली विशेष छाप सोडली. अभिनयासोबत त्यांचा स्टायलिश अंदाज आणि बिनधास्त मतंसुद्धा चर्चेत असतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नीना यांनी वयोवृद्ध जोडप्यांचा ऑनस्क्रीन रोमान्स दाखवण्याबद्दल स्पष्ट मत मांडलंय.
“हिंदी भाषेत एक शब्द आहे, फूडहपन.. म्हणजेच वल्गॅरिटी किंवा अश्लिलता. ते पडद्यावर जाणवू नये. ही गोष्ट दिग्दर्शक आणि अभिनेते दोघांवर अवलंबून आहे. लोकांच्या डोक्यात ही गोष्ट पक्की बसली आहे की तुम्ही एका ठराविक वयानंतरच्या जोडप्याला पडद्यावर शारीरिकदृष्ट्या जवळ दाखवू शकत नाही. ते घाणेरडं दिसेल. परंतु असं काहीच नाही. जर लोकांमध्ये संवेदनशीलता आली तर कायच म्हणावं! गोष्टींकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहावं लागेल”, असं त्या म्हणाल्या.
याविषयी त्यांनी आपला मुद्दा अत्यंत स्पष्टपणे मांडला. त्या पुढे म्हणाल्या, “मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते. 60-70 च्या वयातील जोडप्याला त्यांच्या आयुष्यात रोमान्स नको असतो, हे विचार करणं चुकीचं आहे. असा आपण विचारू करू नये. विशेषकरून भारतात महिला विचार करतात की पुरे झालं. परंतु आता मी पाहते की मध्यमवर्गीय महिलासुद्धा जिमला जातात. त्यांनासुद्धा फिट राहायचं आहे. इच्छा असली पाहिजे. स्वप्न कोण पाहत नाही? आता ऑनस्क्रीन वयोवृद्ध जोडप्यामध्ये रोमान्स दाखवण्याची गोष्ट असेल तर दिग्दर्शक अत्यंत सहजपणे दाखवत असतील तर काय समस्या आहे? वयानुसार प्रेम संपतं का?”
“मला अजूनही रोमँटिक वाटतं. रोमान्स म्हणजे फक्त सेक्स किंवा आकर्षण नाही. रोमान्स म्हणजे स्वत:बद्दल, आपल्या पार्टनरबद्दल चांगलं वाटणं, प्रेमाची भावना निर्माण होणं. मी जेव्हा चांगले कपडे घालून तयार होते, तेव्हा मला स्वत:विषयी खूप चांगलं वाटतं. मी जेव्हा दिल्लीत राहत होते, तेव्हा मी कधीच बिकिनी घातली नव्हती. पण जेव्हा मी मुंबईत आले आणि एकटी राहू लागले, तेव्हा मी माझ्या बाथरुममध्ये बिकिनी घालायचे. आरशासमोर स्वत:ला पाहून मी खुश व्हायचे. त्यावेळी मोबाइल फोनसुद्धा नव्हते. यालाही एक प्रकारचा रोमान्स म्हणता येईल. स्वत:बद्दल चांगलं वाटणं याला काही वयोमर्यादा नाही”, असं मत नीना गुप्ता यांनी मांडलं.