
बॉलिवूड अभिनेत्री नरगिस फाखरी टीव्ही 9 नेटवर्कच्या दुबईमध्ये ‘न्यूज 9 ग्लोबल समिट’मध्ये हजेरी लावली. यावेळी तिने तिच्या बॉलिवूडमधील तिच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल मनमोकळेपणाने सांगितले. नरगिस फाखरीने परदेशातून येऊन बॉलिवूडमध्ये नाव कमावणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत स्थान मिळवले आहे. तिने आतापर्यंत अनेक उत्कृष्ट चित्रपटात काम केले आहे. पण जर ती चित्रपटसृष्टीत आली नसती, तर तिने काय केले असते, याबद्दल नरगिसने भाष्य केले आहे. यावेळी तिने तिच्या आयुष्याच्या विविध पैलूंबद्दल चर्चा केली.
नरगिस फाखरीला ‘डायरी ऑफ अ रॉकस्टार’मध्ये मुलाखतीदरम्यान ‘हाऊसफुल 3’ आणि ‘हाऊसफुल 5’ या दोन चित्रपटांमधील कोणता चित्रपट सर्वात चांगला होता? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने भाष्य केले. हा काय प्रश्न आहे? मी दोघांपैकी एका चित्रपटाची निवड कशी करु? हाऊसफुल 3 आणि हाऊसफुल 5 या दोन्ही चित्रपटात काम करताना मला फारच मस्त वाटले. या दोन्ही चित्रपटात फक्त एकच फरक होता तो म्हणजे माझा वेळ. मी हाऊसफुल 3 पेक्षा हाऊसफुल 5 या चित्रपटात जास्त वेळ काम केले.
कारण मी त्या चित्रपटाच्या शूटींगवेळी जास्त लोकांशी बोलले. सर्वांसोबत मिसळले आणि सहकलाकरांना चांगल्या प्रकारे समजून घेतले. मी या काळात खूप ऑथेंटिक होते. मी स्वत: तो काळ आनंदाने घालवला, असे नरगिसने म्हटले.
यानंतर नरगिस फाखरीला जर तू या सिनेसृष्टीत नसतीस तर काय काम करत असतीस, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने सविस्तरपणे उत्तर दिले. जर मी चित्रपटसृष्टीत नसती तर हॉलेस्टिक हीलर असते. मी त्याबद्दल खूप अभ्यास केला आहे. तसेच याबद्दल मी चांगले संशोधनही केले आहे. त्यामुळे मी त्याबद्दलच काहीतरी काम केले असते, असे नरगिस फाखरीने म्हटले.
दरम्यान नरगिस फाखरी अलीकडेच अक्षय कुमारच्या ‘हाउसफुल 5’ या मल्टीस्टारर चित्रपटात झळकली. त्या ‘हाउसफुल 4’चा भाग नव्हत्या, परंतु २०१६ मध्ये आलेल्या ‘हाउसफुल 3’ मध्ये त्या झळकल्या होत्या. सध्या, नरगिस पवन कल्याणच्या ‘हरी हरा वीरा मल्लू’ या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहेत.