
टीव्ही 9 नेटवर्कतर्फे दुबईमध्ये ‘न्यूज 9 ग्लोबल समिट’ पार पडत आहे. या न्यूज 9 ग्लोबल समिटमध्ये जगभरातील प्रसिद्ध व्यक्ती सहभागी झाल्या आहेत. फक्त बॉलीवूड नाही तर टीव्ही इंडस्ट्रीमधील नामांकीत व्यक्तींनी या समिटमध्ये सहभाग घेतला. टेलीव्हीजन क्वीन म्हणून प्रसिद्ध असणारी एकता कपूरसुद्धा या समिटमध्ये आली. एकता कपूर हिने तिच्या जीवनातील संघर्ष, करियर यावर चर्चा केली.
एकता कपूर हिने न्यूज9 ग्लोबल समिट 2025 मधील ट्रेंडसेटर सेगमेंटमध्ये सहभाग घेतला. या सेगमेंटमध्ये एकताने टीव्ही 9 चे एमडी बरुण दास यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. एकताने सांगितले की, तिचे वडील जितेंद्र यांना तिच्यावर विश्वास होता. त्यामुळेच ती आज या ठिकाणापर्यंत मजल मारु शकली. एकताचा संघर्ष एखाद्या चित्रपटाप्रमाणे आहे. त्यावर टीव्ही 9 सोबत तिने चर्चा केली.
एकता ज्योतिषशास्त्रावर खूप विश्वास ठेवते. तिला ओळखणाऱ्या लोकांना हे चांगलेच माहीत आहे. बरेच लोक असेही म्हणतात की, एकता अंधश्रद्धेला प्रोत्साहन देते? या प्रश्नाच्या उत्तरात एकता म्हणाली, लोक काय म्हणतात, त्यामुळे मला काही फरक पडत नाही. मी या प्रकारच्या कोणत्याही गोष्टींकडे लक्ष देत नाही. जे ज्योतिषशास्त्राला अंधविश्वासाचे नाव देतात, त्यांच्याकडून मी मालिकाही घेत नाही. माझा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे. तो मी सोडू शकत नाही. अनेक जण यासंदर्भात बोलत राहतात.
एकताने म्हटले की, ज्योतिषशास्त्रावर विश्वास न ठेवणाऱ्या कोणालाही मी जज करत नाही. त्यामुळे लोक माझ्याबद्दल जजमेंट करतील अशी मी अपेक्षा करत नाही. तुम्ही कोणासाठी जजमेंटल बनू शकत नाही. तसेच बनायलाही नको. एकता कपूरने खूप कमी वयात आपल्या करियरला सुरवात केली. वयाच्या 19 व्या वर्षीच ती एंटरप्रेन्योर बनली. या वयात यश मिळवणे सोपी गोष्ट नाही.