
टीव्ही 9 नेटवर्कचा न्यूज 9 ग्लोबल समिट दुबईमध्ये आयोजित करण्यात आला. या समिटमध्ये बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. विवेक ओबेरॉय, सुनिल शेट्टी, विनीत कुमार सिंहसह इतरही अनेक कलाकार या समिटला उपस्थित होते. यात टेलिव्हिजन क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकता कपूरचाही समावेश होता. निर्माती एकता कपूरने कमी वयातच तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि वयाच्या 19 व्या वर्षीच ती उद्योजक बनली. इतक्या लहान वयात हे यश मिळवणं सोपं नव्हतं. ‘न्यूज 9 ग्लोबल समिट’च्या मंचावर टीव्ही 9 चे सीईओ आणि एमडी बरुण दास यांनी याबाबत एकता कपूरला विचारलं.
इतक्या लहान वयात उद्योजक होण्यासाठी तुला कोणी मार्गदर्शन केलं, असा प्रश्न एकताला विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, “माझ्या वडिलांनी (अभिनेते जितेंद्र) डॉल्फिन टेलिफिल्म्स नावाची कंपनी सुरू केली होती. त्यात त्यांचा एक पार्टनर होता. माझ्या वडिलांनी मला म्हटलं की, तू कंटेंट बनवायला हवं, तुला टेलिव्हिजन आवडतं. मी तुला दोन पर्याय देतो, एकतर तू लग्न कर किंवा मग काम करायला सुरुवात कर.”
याविषयी एकता पुढे म्हणाली, “..आणि मला लग्न तर अजिबात करायचं नव्हतं. त्यामुळे मी काम करण्यास सुरुवात केली. वडिलांनी मला हेसुद्धा स्पष्ट केलं होतं की , फक्त घर बसून राहशील आणि काहीच काम करणार नसशील तर मी तुझी बिलं भरणार नाही. तुला स्वत:लाच तुझा खर्च सांभाळावा लागेल. वडिलांकडून या गोष्टी ऐकणं माझ्यासाठी खूप धक्कादायक होतं. कारण ते माझ्यावर खूप प्रेम करायचे. नंतर त्या कंपनीतून माझ्या वडिलांच्या पार्टनरने माघार घेतली. त्यांनी वडिलांवर आरोप केले की तुम्हाला तुमच्या मुलीलाच सेटअप करायचं आहे, तुम्हाला तिलाच नोकरी द्यायची आहे. यासाठीच तुम्ही या कंपनीची सुरुवात केली, हे स्पष्ट दिसतंय.”
“मला हे सर्व ऐकून खूप वाईट वाटलं होतं. तेव्हा माझ्या वडिलांनी मला म्हटलं होतं की, मी तुझ्यासाठी पैशांची गुंतवणूक करू शकतो, माझ्या विश्वासाची गुंतवणूक करू शकतो. परंतु माझा पार्टनर माझ्याशी सहमत नाही. त्यामुळे माझा विश्वास तुझ्यासोबत आहे. वडिलांनी म्हटलेली ही गोष्ट माझ्यासाठी प्रेरणा ठरली होती”, अशा शब्दांत एकताने भावना व्यक्त केल्या आहेत.