माझ्याविरुद्ध 500 केसेस झाल्या.. News9 Global Summit च्या मंचावर एकता कपूर स्पष्टच बोलली

न्यूज9 ग्लोबल समिटच्या मंचावर प्रसिद्ध प्रोड्यूसर एकता कपूरने हजेरी लावली. एखाद्या कंटेंटचा लोकांवर काय परिणाम होतो, यावर तिने परखडपणे मत मांडलं. अश्लील शो बनवण्याच्या आरोपांवर तिचं काय म्हणणं आहे, चला जाणून घेऊया.

माझ्याविरुद्ध 500 केसेस झाल्या.. News9 Global Summit च्या मंचावर एकता कपूर स्पष्टच बोलली
एकता कपूर
Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Jun 20, 2025 | 12:22 PM

19 जून रोजी दुबईमध्ये टीव्ही9 नेटवर्कच्या न्यूज9 ग्लोबल समिटचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रसिद्ध प्रोड्यूसर आणि बालाजी टेलिफिल्म्सची सर्वेसर्वा एकता कपूर उपस्थित होती. अनेक विषयांवर संवाद साधतानाच एकताने अश्लील शो बनवण्याच्या आरोपांवरही उत्तर दिलं. खरंतर, तिला ऑल्ट बालाजीबाबत अनेक वादांना तोंड द्यावे लागले. माझ्या विरुद्ध 500 खटले दाखल आहेत असं एकता कपूरने स्पष्टपणे सांगितलं.

तुम्ही कंटेट तयार करता, पण तो तयार करताना तुम्हाला कधी अडचणी आल्या आहेत का ? कारण त्या कंटेंटचा काय परिणाम होईल याचा एक जबाबदार नागरिक नेहमीच विचार करतो, असा प्रश्न टीव्ही9चे एमडी आणि सीईओ बरण दास यांनी विचारला. त्यावर उत्तर देताना एकता कपूर म्हणाली, ” हो नक्कीच, ती दुविधा, अडचण तर नेहमीच सोबत असते. ”

काय म्हणाली एकता कपूर ?

एकता पुढे म्हणाली, “ माझा विवेक, माझा अंतरात्मा मला जो कंटेट बनवण्याची परवानगी देत नाही, असा कंटेट मी बनवतच नाही. बालाजीने कौटुंबिक कंटेंट बनवला आणि त्याला प्रतिबंधात्मक उपाय म्हटले गेले. Alt ने 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचा कंटेंट बनवला, पण त्यामुळे समाजाचे खूप नुकसान होत आहे असं म्हणण्यात आलं. पण हे खूप कमी लोकांना माहीत असेल की मी जेव्हा Alt चालवत होते तेव्हा माझ्यावर 500 पेक्षा जास्त केसेस दाखल झाल्या होत्या. खरंतरं मी ते (Alt) अगदीच कमी काळासाठी चालवलं होतं.”

एकता कपूर बऱ्याच काळापासून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. ती छोट्या पडद्यावरची सर्वात यशस्वी निर्माती आहे. तिने वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी काम करायला सुरुवात केली आणि वयाच्या 19 व्या वर्षी तिने एक उद्योजक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. माझ्या वडीलांना ( अभिनेता जितेंद्र) माझ्यावर खूप विश्वास होता, त्याच विश्वासामुळे मला प्रेरणा मिळाली आणि म्हणूनच आज मी या स्थानी आहे, असं एकत कपूरने नमूद केलं.

पहिला शो कोणता होता ?

1995 साली आलेला ‘हम पांच’ हा एकता कपूरचा पहिला टीव्ही शो होता. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही आणि एकामागून एक शो करत राहिली. एकताबद्दल असेही म्हटले जाते की ती एक अशी निर्माती आहे जिने सर्वाधिक कलाकारांना लाँच केले आहे.