अभिनेत्रीची दहशत, बंदुकीच्या धाकावर निर्मात्याला लुबाडलं, ऑफिसमध्ये बंद केलं आणि…
अभिनेत्रीने साथीदारांसह केलं भयानक कृत्य, बंदुकीच्या धाकावर निर्मात्याला लुबाडलं, घेतले लाखो रुपये, अभिनेत्री विरोधात FIR दाखल... पोलीस याप्रकरणी आता पुढील चौकशी करत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे...

Actress Nikita Ghag: अभिनेत्री निकीता घाग आणि तिच्या काही साथीदारांविराधात एका निर्मात्याने पोलिसांत एफआयआर (FIR) दाखल केला आहे. निर्मात्याने अभिनेत्रीवर आरोप केले आहेत की, ऑफिसमध्ये घुसून आणि बंदुकीच्या धाकावर 10 लाख रुपये लुबाडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमा निर्मात्याचं नाव कृष्णकुमार वीरसिंह मीणा उर्फ के. कुमार असं आहे. निर्मात्याला बदनाम करण्याची धमकी देण्यात आली आणि जबरदस्तीने 10 लाख रुपये वसूल करण्यात आल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी निकिता घाग आणि इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
एवढंच नाही तर, निर्मात्याला त्याच्या ऑफिसमध्ये काही काळ बंद करण्यात आल्याची माहिती देखील समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना 14 ऑगस्टच्या संध्याकाळी अंधेरी पश्चिम येथील चित्रलेखा हेरिटेज स्टूडियो (Chitralekha Heritage Studio) घडली आहे. निर्मात्याने सांगितल्यानुसार, ऑफिसमध्ये काही कलाकार आणि मित्रांसोबत असताना निकीता ऑफिसमध्ये पोहोचली.
निकीता हिच्यासोबत जवळपास 10 – 15 बळजबरी ऑफिसमध्ये घुसले आणि शिवीगाळ देखील करु लागले. त्यांनी ऑफिसमधील अन्य लोकांना बाहेर जाण्यास देखील सांगितलं… त्यामधील एका व्यक्तीने स्वतःची ओळख दादा सांगत माझं नाव विवेक जगताप असल्याचं सांगितलं आहे.
एफआयआरनुसार, निकिता आणि तिच्या सहकाऱ्यांनी चित्रपट निर्मात्याला धमकी देत सांगितलं, खोटे आरोप करून त्याची प्रतिष्ठा खराब करतील. त्या बदल्यात त्यांनी 25 लाख रुपये मागितले. निर्मात्याने विरोध केला तेव्हा त्याला मारहाण करण्यात आली. यादरम्यान एका व्यक्तीने चाकू दाखवला तर विवेक जगतापने पिस्तूल दाखवून धमकी दिली.
परिस्थितीला घाबरुन निर्मात्याने 10 लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केल. एवढंच नाही तर, आरोपीने निर्मात्याच्या कर्मचाऱ्याला निकितासाठी अॅडव्हान्स अॅक्टिंग फी म्हणून रक्कम नमूद करणारा ईमेल लिहिण्यास भाग पाडलं. निर्मात्याने सांगितलं की, त्याला तब्बल तीन तास ऑफिसमध्ये बंद ठेवण्यात आलं होतं. शिवाय याबद्दल कोणाला सांगितल्यास परिणाम वाईट होतील… असं देखील निर्मात्याला धमकावण्यात आलं.
या घटनेनंतर निर्मात्याने पोलिस स्टेशन गाठलं आणि गुन्हा दाखल केला. पोलिसांनी निकिता घाग आणि इतर आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी), शस्त्रास्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
