‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’च्या प्रोमो शूटिंगदरम्यान कलाकारांची धमाल मस्ती

डॉ. निलेश साबळे यांचा नवीन शो 'हसताय ना, हसायलाच पाहिजे' कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या प्रोमोचं शूटिंग करताना कलाकारांनी किती धमाल केली, त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

हसताय ना? हसायलाच पाहिजेच्या प्रोमो शूटिंगदरम्यान कलाकारांची धमाल मस्ती
Bhau Kadam and Onkar Bhojane
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 30, 2024 | 10:56 AM

अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे गेल्या काही दिवसांपासून त्याच्या नव्या शोमुळे चर्चेत आहे. ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ हा त्याचा नवीन शो कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमाचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होताच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. शोचे प्रोमो, टीझर आणि शीर्षक गीत यांबद्दल सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू होती. आता नुकताच या शोच्या प्रोमोचा बीटीएस (बिहाइंड द सीन) व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या भन्नाट व्हिडीओवरही चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

हा प्रोमो शूट करताना कलाकारांना किती मज्जा आली आणि त्यांची मस्ती-धमाल यात पहायला मिळतेय. हा व्हिडीओ तुम्हालाही पोट धरून हसायला भाग पाडेल. निलेश साबळे, भाऊ कदम, ओंकार भोजने आणि सुपर्णा श्याम यांच्यासोबतच कलर्स मराठीचे प्रोग्रॅमिंग हेड केदार शिंदेदेखील या प्रोमो शूटच्या वेळी हजर होते. ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ या कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. ओंकार भोजने आणि भाऊ कदम यांच्या विनोदावर ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची संपूर्ण टीम पोट धरून हसत होती. यासोबत अभिनेते भरत जाधव आणि अलका कुबल हेदेखील विनोदांवर खळखळून हसत होते.

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या शोचं लेखन, दिग्दर्शन डॉ. निलेश साबळे यांनी केलं आहे. तर भाऊ कदम, ओंकार भोजने या विनोदवीरांसोबत सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण हे कलाकारदेखील शोच्या टीममध्ये समाविष्ट आहेत. हा शो दर शनिवार-रविवार रात्री नऊ वाजता आणि कधीही जिओ सिनेमावर (JioCinema) तुम्ही पाहू शकता.

सलग दहा वर्षे प्रेक्षकांना खळखळून हसवल्यानंतर ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर निलेश साबळे हे मनोरंजनाचा धमाकेदार खजिना घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या नव्या शोमध्ये महाराष्ट्राचे कॉमेडी किंग आणि अत्यंत संवेदनशील गुणी अभिनेते भरत जाधव आणि चार दशकं सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या अलका कुबल आठल्ये हे दर भागामधे सेलिब्रिटी पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला दाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.