
दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचं सिनेसृष्टीतील अमूल्य योगदान सर्वश्रुत आहे. कलाक्षेत्रातील त्यांच्या याच प्रवासाचा आढावा ‘मी बहुरुपी’ नावाच्या त्यांच्या आत्मचरित्रातून घेण्यात आला आहे. यामध्ये त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफसुद्धा व्यक्त झाल्या आहेत. लग्न करण्याच्या आधीपासूनच एक मनस्वी कलाकार म्हणून अशोक सराफांनी निवेदिता यांच्या आयुष्यात स्थान मिळवलं होतं. मी या कलाकाराची जबरदस्त फॅन होते आणि आजही आहे, असं त्यांनी या आत्मचरित्रात म्हटलंय. अशोक सराफ यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत कित्येक सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. भूमिका किती छोटी आहे किंवा किती मोठी.. हे त्यांनी कधीच पाहिलं नाही. तर मिळालेल्या भूमिकेला योग्य न्याय कसा मिळवून द्यायचा, याचा त्यांनी विचार केला.
अशोक सराफ यांच्या भूमिका निवडीबद्दल बोलताना निवेदिता म्हणाल्या, “त्यांच्या चित्रपटांची यादी पाहिली की लक्षात येतं की खरं तर बऱ्याच चित्रपटांमध्ये त्यांची मुख्य भूमिकाही नाही. तरीही ती उठून येते, चित्रपट संपल्यानंतरही मुख्य व्यक्तिरेखांइतकीच ती आपल्या मनात रेंगाळत राहते. भूमिका कितीही छोटी असो, अशोक सराफ नावाचा नट पडद्यावर आला की आपण त्याच्यावरची नजर हटवूच शकत नाही. त्याला परमेश्वरानं रुप दिलेलं नाही, देखणं शरीर दिलेलं नाही, ताकद आहे ती त्याच्या अभिनयाची. ती त्याच्याकडे भरभरून आहे. त्या प्रतिभेला झळाळी आणण्यासाठी लागणारा विचारही आहे.”
या आत्मचरित्रात अशोक सराफ यांच्या प्रामाणिकतेविषयीही निवेदिता व्यक्त झाल्या. एखादी गोष्ट आपल्याला माहीत नसेल तर ते तसं मोकळेपणानं सांगून टाकतात. प्रत्येक वेळी आपणच आकर्षणाचा केंद्रबिंदू असायला हवं, असा त्यांचा अट्टहास कधीच नसतो. समोरची व्यक्ती काही समजावून सांगत असेल तर शांतपणे ते ऐकून घेतात. एखादा नवखा कलाकार असेल तर आपल्या मोठेपणाचं ओझं त्याच्यावर येणार नाही, याची काळजी ते आवर्जून घेतात. त्यामुळे त्यांच्याकडे पाहताना हा माणूस इतका मोठा स्टार आहे, अशी भावना समोरच्याच्या मनात कधी येत नसल्याचं, निवेदिता सराफ यांनी म्हटलंय.