Nora Fatehi | 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात नोरा फतेहीबाबत सुकेशचा मोठा खुलासा, “जॅकलिनविरोधात ती..”

सुकेशने त्याचा वकील अनंत मलिक आणि एके सिंग यांच्यामार्फत एक पत्र जारी केलं आहे. नोराने जॅकलिन फर्नांडिसच्या विरोधात माझा ब्रेनवॉश केला, असा आरोप त्याने या पत्रात केला आहे.

Nora Fatehi | 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात नोरा फतेहीबाबत सुकेशचा मोठा खुलासा, जॅकलिनविरोधात ती..
Sukesh Chandrasekhar and Nora Fatehi
Image Credit source: PTI, Instagram
| Updated on: Jan 22, 2023 | 11:48 AM

नवी दिल्ली: 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं आरोपपत्र दाखल केलं. त्यानंतर आता आरोपी सुकेश चंद्रशेखर याने शनिवारी अभिनेत्री नोरा फतेहीबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. सुकेशने त्याचा वकील अनंत मलिक आणि एके सिंग यांच्यामार्फत एक पत्र जारी केलं आहे. नोराने जॅकलिन फर्नांडिसच्या विरोधात माझा ब्रेनवॉश केला, असा आरोप त्याने या पत्रात केला आहे. इतकंच नव्हे तर नोरा जॅकलिनचा फार द्वेष करायची असंही त्याने म्हटलंय.

“नोरा दिवसातून किमान 10 वेळा मला कॉल करायची. जर मी तिचा कॉल उचलला नाही तर ती सतत मला कॉल करत राहायची. मी आणि जॅकलिन रिलेशनशिपमध्ये असल्याने मी नोराला टाळत होतो. पण ती सतत मला फोन करून त्रास देत राहिली. तिचा नातेवाई बॉबीला म्युझिक प्रॉडक्शन कंपनी स्थापन करण्यास मदत करण्यास ती सांगायची”, असं त्याने या पत्रात म्हटलंय.

सुकेशने नोरावर दोन कोटी रुपयांची ब्रँडेड बॅग मागितल्याचाही आरोप केला आहे. “ती मला सतत हर्मीस ब्रँडची बॅग आणि तिला हव्या असलेल्या दागिन्यांचे फोटो पाठवत राहिली. त्या सर्व वस्तू तिने मला द्यायला भाग पाडलं. ती आजपर्यंत त्या सर्व वस्तू वापरते. तिच्याकडे असलेल्या हर्मीस ब्रँडच्या बॅगचं बिल तिला विचारा. ती कधीच तुम्हाला ते बिल दाखवू शकणार नाही. कारण त्या बॅगची किंमत दोन कोटींपेक्षा जास्त आहे”, असा दावा सुकेशने केला.

नोराने आधी ईडीसमोर वेगळा जबाब नोंदवला होता आणि नंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे वेगळा जबाब नोंदवल्याचा आरोपही त्याने केला आहे. तिची ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या चार्जशीटमधील जबाबांची खूप चांगल्या प्रकारे पडताळणी केली जाऊ शकते, असं त्याने म्हटलंय. या पत्रात सुकेशने निक्की तांबोळी आणि चाहत खन्ना यांचाही उल्लेख केला आहे. या दोघी अभिनेत्री फक्त प्रोफेशनल कामासाठी भेटायच्या, असं त्याने स्पष्ट केलं.