Onkar Bhojane : शूट संपल्यावर रात्री… ओंकार भोजनेनं सांगितलं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडण्याचं कारण

Onkar Bhojane On Maharashtrachi Hasyajatra : ओंकार भोजनेनं काही वर्षांपूर्वी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडलेली. एका मुलाखतीत ओंकारनं हास्यजत्रा सोडण्याचं कारण सांगितलं आहे.

Onkar Bhojane : शूट संपल्यावर रात्री... ओंकार भोजनेनं सांगितलं महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडण्याचं कारण
| Updated on: Sep 29, 2026 | 3:36 PM

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमानं अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळवून दिली. त्यापैकी एक म्हणजेच ओंकार भोजने. ओंकार भोजनेचा मोठा चाहतावर्ग असून काही महिन्यांपूर्वी अभिनेत्यानं अचानक हास्यजत्रा सोडली. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर ओंकारनं हास्यजत्रेत पुन्हा पदार्पण केलं. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीत ओंकार भोजनेनं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडण्याचं कारण सांगितलं आहे.

काय म्हणाला ओंकार भोजने?

Loading...

ओंकार भोजने म्हणाला की, ‘मी हास्यजत्रा सोडली ती म्हणजे अशा कारणासाठी की, तेव्हा सिनेमे येऊ लागले होते. सिनेमांसाठी जुळवून घ्यायला लागायचं. आणि आतासारखीची टीम तेव्हा नव्हती. आता टीममध्ये असे बरेच ऑप्शन आहेत की, आपण एक-दुसऱ्याला अॅडजस्ट करुन शेड्यूल करु शकतो. पुढे नेऊ शकतो. तेव्हा तशी छोटी टीम होती. तेव्हा सारखं ते जुळवून घ्यायला बरं वाटायचं नाही.’

‘मी सरांसोबत बोलायचो की, असं होतंय. त्यामुळे एक काम धड होत नाही. मला उगाचच खूप काम करायचंय, शूट संपल्याच्या रात्री आपण प्रवास करुन निघायचं, सिनेमाचं काम करायचं, तिथून परत निघायचं. हे मला नाही जमत. त्यामुळे मी सरांना असं म्हटलं, मी थांबतो. थांबण्याचा निर्णय अर्थात बोलूनच होता. मग थांबलो. त्यानंतर दोन-चार सिनेमे झाले. त्यादरम्यान बोलणी सुरू होती. म्हणजे मी मुद्दाम अमित फाळके सर आणि गणेश सागडे सरांचं नाव घेईल. त्यांनी चॅनलच्या वतीनं आम्हाला पालकांसारखंच सांभाळलंय. त्या सगळ्या ट्रोलिंगच्या काळातही ते संपर्कात होते. त्यांनी मला सांगितलं, जसं ते पूर्ण होईल, तेव्हा तू तुझा वेळ घे. पण तू ये. तुझ्यात क्षमता आहे. आपण करुयात. असं करत करत मग मी पुन्हा जॉईन झालो. इतकं सोप्पं आणि सरळ होतं.’

‘मला काहीतरी वाटलं, मग मी निर्णय घेतला, मग मी सिनेमात गेलो. मग सिनेमा वर्क नाही झाले, मला कळलं, मग मी परत आलो, असं नाही. आता मी परत येण्याचं खरं कारण असं, मला कॉमेडीची प्रक्रिया खरंच पडताळून बघायची आहे. कॉमेडी आपण जे नेहमी म्हणतो, सीरियस बिझनेस, म्हणजे नेमकं काय? एका ठराविक बॅचनंतर सीलॅबस तर अपडेट व्हायला हवा, जो पुढे न्यायचाय. त्यामुळे बाकी काम करताना त्याची कोपऱ्यात नोंद करुन ठेवेल. कॉमेडीला कशी हाताळली जाते, उद्या १०- १५ वर्षानंतर जेव्हा पुन्हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चं नाव येईल, म्हणजे तोपर्यंत असेलच पण आणखी पुढे तेव्हा ते कॉमेडी करताना काय विचार करायचे, कुठल्या गोष्टी पाळायचे, माणूस म्हणून, कलाकार म्हणून टीम म्हणून, या सगळ्याच्या नोंदी खूप गरजेच्या आहेत आणि त्या यायलाच पाहिजेत.’ असं ओंकारनं पुढे सांगितलं. ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत ओंकार बोलत होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us