
टीव्हीएफच्या ‘पंचायत’ या लोकप्रिय वेब सीरिजच्या चौथ्या सिझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. नुकताच हा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिझनमध्ये क्रांती देवी आणि मंजू देवी यांच्यात प्रधान बनण्यासाठी रंगलेली चुरस पहायला मिळतेय. ‘पंचायत’च्या या चौथ्या सिझनला आतापर्यंत प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. या सीरिजचे पहिले तीन सिझन तुफान गाजले. यातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. यामध्ये अभिनेता जितेंद्र कुमारने सचिवजीची भूमिका साकारली आहे, तर रघुबीर यादव हे प्रधानच्या भूमिकेत आहेत. मंजू देवीपासून प्रहलाद आणि विकास-रिंकीसुद्धा घराघरात लोकप्रिय झाले आहेत. ‘पंचायत’मुळे मिळालेल्या प्रसिद्धीचा सर्वाधिक फायदा कोणी घेतला आणि या सिझनसाठी सर्वाधिक मानधन कोणाला मिळालं, ते जाणून घेऊयात..
‘पंचायत 4’साठी ज्या अभिनेत्याला सर्वाधिक मानधन मिळालं आहे, त्याचं डोकं अत्यंत जलद गतीने काम करतं. तो स्वत:च्या समस्या जरी सोडवू शकला नसला तरी मंजू देवी आणि प्रधानजी यांच्या प्रत्येक समस्येचं उत्तर त्याच्याकडे असतं. आतापर्यंत तुम्हाला समजलंच असेल की हे पात्र नेमकं कोणतं आहे? ‘पंचायत’मधल्या सचिवजींना चौथ्या सिझनसाठी सर्वाधिक फी मिळाली आहे.
या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री नीना गुप्ता या जरी ज्येष्ठ कलाकार असल्या तरी ‘पंचायत’ला खरी प्रसिद्धी सचिवजींमुळे मिळाली आहे. ‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार, जितेंद्र कुमार अर्थात अभिषेक त्रिपाठीला या चौथ्या सिझनच्या प्रत्येक एपिसोडसाठी 70 हजार रुपये मानधन मिळालं आहे. म्हणजेच संपूर्ण सिझनसाठी त्याला 5 लाख 60 हजार रुपये मिळाले आहेत.
मानधनाच्या बाबतीत जितेंद्र कुमारनंतर दुसरा क्रमांक नीना गुप्ता यांचा लागतो. या संपूर्ण सिझनसाठी त्यांना चार लाख रुपये मानधन मिळालं आहे. प्रत्येक एपिसोडसाठी त्यांची फी 50 हजार रुपये होती. तिसऱ्या क्रमांकावर त्यांचे ऑनस्क्रीन पती आणि फुलेरा गावाचे प्रधान आहेत. अभिनेते रघुवीर यादव यांना प्रत्येक एपिसोडसाठी 40 हजार रुपये फी मिळाली आहे. म्हणजेच या चौथ्या सिझनमधून त्यांनी 3 लाख 20 हजार रुपये कमावले आहेत. प्रहलादची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला प्रत्येक एपिसोडसाठी 20 हजार रुपये मिळाले आहेत. म्हणजेच संपूर्ण सिझनसाठी त्याला 1 लाख 60 हजार रुपये मिळाले आहेत. तर चंदन रॉय म्हणजेच विकासलाही तेवढंच मानधन मिळालं आहे.