Pathaan: मॉलमध्ये ‘पठाण’विरोधात बजरंग दलाचा जोरदार हंगामा; फाडले शाहरुख खानचे पोस्टर

पठाणवरून हंगामा सुरूच, मॉलमध्ये बजरंग दलाकडून तोडफोड, फाडले शाहरुखचे पोस्टर

Pathaan: मॉलमध्ये पठाणविरोधात बजरंग दलाचा जोरदार हंगामा; फाडले शाहरुख खानचे पोस्टर
मॉलमध्ये 'पठाण'विरोधात बजरंग दलाचा हंगामा
Image Credit source: Twitter
| Updated on: Jan 05, 2023 | 7:59 AM

अहमदाबाद: शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या आगामी ‘पठाण’ या चित्रपटाचा वाद काही थांबण्याच नाव घेत नाहीये. या चित्रपटाविरोधात बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषदच्या कार्यकर्त्यांनी अहमदाबादमधल्या मॉलमध्ये जोरदार हंगामा केला. पठाणच्या प्रदर्शनाला विरोध करण्यासाठी बुधवारी बजरंद दल आणि विश्व हिंदु परिषदच्या कार्यकर्त्यांनी अहमदाबादमधल्या वस्त्रपूर मॉलमध्ये तोडफोड केली. यावेळी त्यांनी चित्रपटाचे पोस्टरसुद्धा फाडले.

सोशल मीडियावर या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. संतप्त कार्यकर्ते हे शाहरुखविरोधात घोषणाबाजी करताना या व्हिडीओत पहायला मिळत आहे. विरोध आणि निदर्शनं करतानाच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ‘पठाण’ हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा इशारासुद्धा दिला.

“दीपिका पदुकोणने या चित्रपटात ज्या प्रकारचे कपडे परिधान केले आहेत, त्याचा आम्ही विरोध करतोय. पठाण हा चित्रपट लव्ह-जिहादला प्रेरणा देणारा आहे. त्यामुळे आम्ही त्याला प्रदर्शित होऊ देणार नाही”, असं बजरंग दलचे अध्यक्ष ज्वलित मेहता म्हणाले.

‘पठाण’वरून इतका वाद का?

12 डिसेंबर रोजी या चित्रपटातील पहिलं गाणं ‘बेशर्म रंग’ प्रदर्शित झालं होतं. या गाण्यातील एका दृश्यात दीपिका भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसली. यावरूनच मोठा वाद सुरू झाला. दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधान करून, बोल्ड दृश्ये देत सनातन धर्माचा अपमान केला, असा आरोप काही हिंदू संघटनांनी केला.

‘बेशर्म रंग’ हे गाणं प्रदर्शित झाल्यापासून पठाण या चित्रपटाचा विरोध सर्वत्र होत आहे. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सेन्सॉर बोर्डानेही चित्रपटात काही बदल सुचवले आहेत. यात ‘बेशर्म रंग’ या गाण्याचाही समावेश आहे. सेन्सॉर बोर्ड नेहमीच कलाकारांची कल्पकता आणि प्रेक्षकांची संवेदनशीलता यांच्यात सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न करते, असं प्रसून जोशी म्हणाले होते.