Prabhu Deva | प्रभू देवाने सहन केलंय मुलाला गमवण्याचं दु:ख; 13 वर्षीय मुलाने डोळ्यांसमोर घेतला अखेरचा श्वास

प्रभू देवाने 2020 मध्ये हिमानी सिंहशी लग्न केलं. या लग्नाविषयी फारशी कोणाला माहिती नव्हती. जेव्हा त्याबद्दल लोकांना समजलं तेव्हा त्याची खूप चर्चा झाली होती. त्यावेळी प्रभू देवाचं वय 47 वर्षे होतं आणि आता वयाच्या 50 व्या वर्षी तो चौथ्यांदा पिता बनला आहे.

Prabhu Deva | प्रभू देवाने सहन केलंय मुलाला गमवण्याचं दु:ख; 13 वर्षीय मुलाने डोळ्यांसमोर घेतला अखेरचा श्वास
Prabhu Deva
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 14, 2023 | 8:35 AM

मुंबई : अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, डान्सर आणि कोरिओग्राफर प्रभू देवाच्या आयुष्यात नुकतंच चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. 2020 मध्ये दुसरं लग्न केल्यानंतर प्रभू देवा आता एका मुलीचा पिता बनला आहे. मात्र त्याच्या आयुष्यात एक वेळ अशी होती जेव्हा प्रभू देवाने त्याच्या स्वत:च्या मुलाला अखेरचा श्वास घेताना पाहिलं. 15 वर्षांपूर्वी जेव्हा त्याच्या 13 वर्षांच्या मुलाचं निधन झालं, तेव्हा प्रभू देवाच्या आयुष्यातील तो सर्वांत कठीण काळ होता. वडील म्हणून तो पूर्णपणे खचला होता.

2008 मध्ये ब्रेन कॅन्सरने झालं निधन

2008 मध्ये प्रभू देवाच्या 13 वर्षीय मुलाला ब्रेन कॅन्सर असल्याचं निदान झालं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. विशाल असं त्याच्या मुलाचं नाव होतं. प्रभू देवाला त्यावेळी तीन मुलं होती. काही दिवस कॅन्सरशी लढा दिल्यानंतर विशालची झुंज अपयशी ठरली. त्याच्या निधनानंतर प्रभू देवा भावनिकदृष्ट्या खूप खचला होता. मुलाच्या निधनाच्या काही वर्षांनंतर त्याने पत्नीला घटस्फोट दिला. प्रभू देवाने एका मुस्लीम मुलीवर प्रेम केलं. त्याच्या प्रेमाखातर त्या मुलीने हिंदू धर्म स्वीकारत प्रभू देवाशी लग्न केलं होतं. मात्र 16 वर्षांच्या संसारानंतर दोघंही विभक्त झाले.

2020 मध्ये दुसरं लग्न

प्रभू देवाने 2020 मध्ये हिमानी सिंहशी लग्न केलं. या लग्नाविषयी फारशी कोणाला माहिती नव्हती. जेव्हा त्याबद्दल लोकांना समजलं तेव्हा त्याची खूप चर्चा झाली होती. त्यावेळी प्रभू देवाचं वय 47 वर्षे होतं आणि आता वयाच्या 50 व्या वर्षी तो चौथ्यांदा पिता बनला आहे. तीन मुलांनंतर प्रभू देवाच्या आयुष्यात एका चिमुकल्या परीचं आगमन झालं आहे.

नयनतारासोबत जोडलं नाव

याआधीही प्रभू देवा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिला. प्रभू देवाचं नाव दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारासोबत जोडलं गेलं होतं. एका चित्रपटाच्या सेटवर दोघं प्रेमात पडले होते. जेव्हा नयनताराने प्रभू देवाला डेट करण्यास सुरुवात केली, तेव्हा प्रभू देवा विवाहित होता आणि त्याला तीन मुलंदेखील होती. मात्र दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. नयनतारा आणि प्रभू देवा हे त्यावेळी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचीही जोरदार चर्चा होती.